
कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्यासाठी जुलै महिना उजाडेल असा अंदाज 3 वैज्ञानिकांच्या पॅनलने वर्तवला आहे. विद्यान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने हे पॅनल गठीत केले आहे. पुढच्या 6 ते 8 महिन्यात कोरोनाची तिसरी लाट धडकण्याची शक्यताही या वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.
SUTRA नावाच्या एका पद्धतीचा वापर करून वैज्ञानिकांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. वैज्ञानिकांनी म्हटले आहे की मे महिन्याच्या शेवटापर्यंत देशाममध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसाला 1.5 लाख इतकी होईल तर जून महिन्याच्या शेवटापर्यंत ही संख्या 20 हजारापर्यंत खाली आलेली असेल. जुलै महिन्यामध्ये ही संख्या आणखीनच कमी झाली असेल. मणिंद्र अग्रवाल हे आय.आय.टी कानपूरचे प्राध्यापक असून ते या वैज्ञानिकांच्या समितीचे सदस्यही आहेत. अग्रवाल यांनी म्हटले आहे की उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरयाणा, दिल्ली आणि गोवा या राज्यांमध्ये दुसऱ्या लाटेतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही परमोच्च बिंदू (पीकवर) पर्यंत पोहोचली आहे. तमिळनाडूमध्ये 29 ते 31 मेपर्यंत आणि पुद्दुचेरीमध्ये 19 ते 20 मेपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या परमोच्च बिंदू गाठेल.
ईशान्येकडच्या राज्यांमध्ये दुसऱ्या लाटेतील कोरोनाग्रस्तांची संख्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचण्यासाठी अजून वेळ असल्याचंही या पॅनेलमधील वैज्ञानिकांनी म्हटले आहे. आसाममध्ये 21 मे पर्यंत, त्रिपुरामध्ये 27 मे पर्यंत दुसऱ्या लाटेतील कोरोनाग्रस्तांची संख्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. पंजाबमध्ये हा बिंदू गाठण्यासाठी 22 मे तर हिमाचल प्रदेशात हा बिंदू गाठण्यासाठी 24 मे उजाडेल असा अंदाज आहे. मणिंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2021 पर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार नाही. ही लाट आली तरी तुलनेने कमी लोकं याने बाधित होतील, कारण तोपर्यंत बऱ्याच जणांची लसीकरण झाले असेल अशी आशाही अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.
SUTRA ही गणितीय पद्धती असून त्याद्वारे कोरोनाच्या तीव्रतेचा अंदाज बांधला जातो. गेल्या वर्षी ही पद्धती विकसित झाली होती आणि ती अंमलात आणली होती. कोरोनाचा प्रसार किती वेगाने, कुठे होऊ शकतो हे या पद्धतीद्वारे कळू शकतं. या पद्धतीचा वापर करणाऱ्या वैज्ञानिकांनी आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात अपयशी ठरल्याची कबुली दिली आहे. या समितीमधील आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक विद्यासागर यांनी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसाला 1.5 लाख लोकं बाधित होतील अशी शक्यता आम्ही वर्तवली होती. वैज्ञानिकांनी ही शक्यता वर्तवली असली तरी प्रत्यक्षात ही संख्या 4 लाखांच्या घरात गेली होती.




























































