#corona स्पेनमध्ये घरात सडताहेत मृतदेह, वृद्धाश्रमातील रुग्णांना मरण्यासाठी सोडलं!

3058

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग दहशतीत आलं आहे. या आजाराचा सर्वाधिक फटका ज्या देशांना बसला आहे, त्यातील एक स्पेन असून तिथे दोन हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 35 हजार जण कोरोना संक्रमित आहेत. सोमवारी स्पेनमध्ये 462 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांच्या वाढत्या संख्येमुळे स्पेनमध्ये भयंकर परिस्थिती ओढवली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इटली आणि चीननंतर स्पेन हा तिसरा सर्वाधिक कोरोनाबाधित असलेला देश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने 14 मार्चपासून स्पेन लॉकडाऊन स्थितीत आहे. पण तरीही कोरोनाग्रस्तांच्या मृत्युत वाढ होताना दिसत आहे. स्पेनमध्ये अनेक घरांत कोरोनाबाधितांचे मृतदेह सडत आहेत, पण त्यांना उचलण्यासाठी त्यांचेच कुटुंबीय पुढे येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना उचलण्यासाठी आता स्पेन सैन्याची मदत घेण्यात येत आहे.

स्पेनचे सैनिक मृतदेहांना उचलून योग्य स्थळी पोहोचवण्याचे काम करत आहेत. त्याशिवाय ते बेवारस मृतदेहही शोधून उचलत आहेत. यासोबतच स्पेन सरकार या व्यक्तींचा मृत्यू कोरोनानेच झाल्याची खात्रीही करत आहे. स्पेनमधील केअर होम्समधल्या वृद्धांची स्थिती आणखी गंभीर आहे. या केअर होम्सपैकी 20 टक्के होम्समध्ये कोरोनाचं संक्रमण झालं आहे. आतापर्यंत 38 वृद्ध कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत. तसंच अनेक वृद्धांना आजारी अवस्थेत कोणत्याही उपचारांशिवाय मरण्यासाठी त्यांच्या पलंगावर तसंच सोडून देण्यात आल्याचंही सैन्याने केलेल्या तपासात उघड झालं आहे. त्यामुळे स्पेन सरकार केअर होम्स विरोधात कडक कारवाई करण्यासाठी पावलं उचलणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या