कोवीशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 12 आठवड्यांचे होणार ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना होऊच नये यासाठीच्या लसींवर विविध देशांमध्ये सातत्याने संशोधन सुरू आहे. हिंदुस्थानसह काही देशांनी कोरोनावरील लस तयार केली असून लसीकरणाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनेकासोबत मिळून कोवीशिल्ड लस तयार केली. या लसीच्या दोन डोसमधील अंतर किती असावे याबाबत अजूनही विचार सुरू आहे. केंद्र सरकारने नेमलेली तज्ज्ञांची समिती गोळा करण्यात आलेल्या आकड्यांच्या आधारे संशोधन करत असून दोन डोसमधील अंतर आणखी वाढवण्याबाबत ही समिती सांगू शकते असे बोलले जात आहे.

लसीच्या परिणामकारकतेचा अभ्यास केल्यानंतर तज्ज्ञांच्या समितीला दिसून आलं की कोवीशिल्डचा दुसरा डोस 6 आठवड्याच्या आत दिला गेला तर त्याची परिणामकारकता 55.1 टक्के इतकी होत आहे. मात्र हे अंतर 12 आठवड्यांचे असल्यास लसीची परिणामकारकता 81.3 टक्के इतकी होते. दोन डोसमधील अंतर वाढवल्यास त्याचा दोन प्रकारे फायदा होऊ शकतो. पहिला म्हणजे अवधी जास्त मिळाल्याने लसींचा पुरवठा अधिक प्रमाणात केला जाऊ शकेल, ज्यामुळे लसीची किंमत कमी होण्यास मदत होऊ शकेल. दुसरा म्हणजे पहिला डोस घेणाऱ्यांसाठी मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होऊ शकेल.

हिंदुस्थानात कोरोनावरील लस टोचण्यासाठीची मोहीम सुरू झाली असून आतापर्यंत जवळपास 16.48 कोटी लोकांना लस टोचण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याबाबतची माहिती दिली होती. 12 राज्ये आणि केंद्रशाशित प्रदेशांमधील 18-44 वयोगटातील 11,64,076 जणांना ही लस देण्यात आली आहे.

लसीकरण आणि स्वयंशिस्त कोरोनाच्या लाटांना थोपवेल

राज्यात कोरोनाची चौथी-पाचवी लाट आली तरी मोठय़ा प्रमाणावर लसीकरण, औषधांचा साठा आणि नागरिकांमधील स्वयंशिस्त या लाटा थोपवू शकेल. लस घेतली तरी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वयंशिस्त पाळल्यास कोरोनाच्या कोणत्याही लाटेतून आपण बाहेर पडू असा विश्वास तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकणार हे 100 टक्के आहे. तिसरीच नाही तर चौथी आणि पाचवी लाटही येईल. लोकांनी गलथानपणा थांबवायला हवा, मास्क घालायलाच हवा, सोशल डिस्टन्सिंगही तितकेच महत्त्वाचे आहे. लोकांचे हे अंगवळणी पडल्यास लाटेत येणारा विषाणू कितीही म्युटंट असला तरी त्यावर आपण मात करू शकू, असे कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांचे म्हणणे आहे.
लसीकरणाबरोबरच जीवनशैली बदलावी लागेल

लाटेचा सामना करायचा असेल तर आपल्याला लसीकरण अधिक महत्त्वाचे आहे. लसीकरणासाठी आपण एक लक्ष्य निश्चित करायला हवे की किती कालावधीत आपण किती जणांचे लसीकरण करणार आहोत. जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येणाऱया लाटेचा आपण सामना करू शकू. पण लसीकरण आपल्याला 100 टक्के कोरोनापासून वाचवेल तर तसे नाही. त्यासाठी आपल्याला आपली जीवनशैलीच बदलावी लागणार आहे. मास्क घालणे, सुरक्षित अंतर राखणे याची आपल्याला सवय करून घ्यावी लागेल, असा सल्ला संसर्गजन्य आजाराचे तज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी दिला.
लाटांचा सामना करायचा तर औषधांचा साठा हवा

लाट रोखायची तर पहिली लोकांनी आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी. कोरोना आटोक्यात आल्यानंतर लोकांचे एकत्र येणे, मीटिंग, रॅली हे सर्व वाढले. यामुळे मोठय़ा प्रमाणावर संसर्ग होऊन दुसरी लाट आली. आता तिसरी लाट येईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ती आटोक्यात आणायची तर लसीकरण अधिक महत्त्वाचे आहे. लसीकरणाबरोबर अधिक महत्त्वाचा आहे तो औषधांचा साठा. कारण दुसऱया लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी जीवरक्षक औषधांचा साठा आपल्याजवळ असणे अधिक महत्त्वाचे असते. तरच आपण या लाटांना सक्षमपणे तोंड देऊ शकू, असे मत हिंदुजा रुग्णालयाचे श्वसनविकारतज्ञ डॉ. अशोक महाशूर यांनी मांडले.
80 टक्के लोकांचे लसीकरण व्हायला हवे

कुठल्याही विषाणूच्या लाटा येतातच. अमेरिकेतील मिशिगनमध्ये सध्या कोरोनाची चौथी लाट आलीय. फ्रान्समध्ये चौथी लाट आहे. कोरोना आपल्यासोबत तीन-चार वर्षे राहणार आहेच. दुसऱया लाटेतून बाहेर पडायला 21 मे ते 15 जूनपर्यंतचा किमान कालावधी लागेल. तेसुद्धा आपण योग्य पद्धतीने वागलो तरच. आपल्याला हर्ड इम्युनिटीसाठी 80 टक्के लोकांचे लसीकरण करावे लागणार. एवढय़ा वेगाने लसीकरण अशक्य असले तरी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली तर आपण त्यावर मात करू शकू, असे शशांक जोशी यांनी स्पष्ट केले.

रक्तदान शिबिरांप्रमाणे लसीकरणाची शिबिरे व्हायला हवीत

केंद्र सरकारने लस उपलब्ध करून दिली तर त्या वेगाने आपल्याला लसीकरण करता येईल. वस्त्या, सोसायटय़ांमध्ये जाऊन लसीकरण करायला हवे. त्याचप्रमाणे विविध कंपन्यांना सीएसआर फंडातून लसीकरण कार्यक्रम राबविण्यास सांगायला हवे. ज्याप्रमाणे आपण रक्तदानासाठी मोबाईल व्हॅन वापरतो त्याप्रमाणे मोबाईल व्हॅन आणि जर कुणाला लसीकरणानंतर त्रास झाला तर सर्व सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका अशी व्यवस्था करून आपण लसीकरण वाढवू शकतो. हर्ड इम्युनिटी वाढून कोरोनाची तिसरी लाट आपल्याला तितकी जाणवणार नाही, अशी सूचना कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी केली.

‘पेटीएम’वर मिळणार कोरोना लसीचा अलर्ट

कोरोना लसीची उपलब्धता आणि लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी विचारात घेता ‘पेटीएम’ने कोरोना लस स्लॉट सर्च करण्यासाठी नवीन टूल लाँच करण्याची घोषणा केली आहे. या टूलच्या माध्यमातून पेटीएम युजर्सना त्यांच्या भागात लसीचा नवीन स्लॉट उपलब्ध झाल्यास अलर्ट मिळेल.

देशातील सर्वात मोठे डिजिटल पेमेंट अॅप असणाऱ्या ‘पेटीएम’चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ट्विटद्वारे गुरुवारी यांसदर्भातील माहिती दिली. पेटीएम कोरोना लस स्लॉटसाठी एक नवीन टूल लाँच करत आहे, ज्यामुळे युजर्स कोरोना लसीचा स्लॉट पाहू शकतील. तसेच या टूलच्या माध्यमातून युजर्सना त्यांच्या भागात नवीन स्लॉट उपलब्ध झाल्यास अलर्ट मिळेल. याशिवाय पेटीएम चॅटच्या माध्यमातून लसीची उपलब्धता याबाबतची माहितीदेखील मिळेल, असे पेटीएमचे म्हणणे आहे.