’कोरोना’ लवकरच रामराम ठोकणार; नवीन संशोधनातून निष्कर्ष

हिंदुस्थान, ब्राझील, अमेरिकेसह  जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. मात्र कोरोनाच्या या कहरातून हिंदुस्थानसह संपूर्ण जगाची लवकरच सुटका होणार आहे. कोरोनावर सध्या जगभरात संशोधन सुरू असून या नवीन संशोधनातून एक निष्कर्ष काढण्यात आला आहे. या वर्षभरात कोरोनाच्या लाटा अनेकदा उसळतील, मात्र त्यानंतर त्या खाली येतील. वर्षभर संपूर्ण जगाला याचा सामना करावा लागणार असला तरी त्यानंतर कोरोना लवकरच जगाला रामराम ठोकणार आहे.

‘जर्नल सायंटिफिक’ने दिलेल्या संशोधनाच्या अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या संशोधनात असेही म्हटले आहे की, थंडीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतील आणि उन्हाळ्यात ते कमीही होतील. भूमध्य रेषेजवळ जे देश आहेत त्या देशांत सर्वात कमी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्याचप्रमाणे जे देश उत्तर आणि दक्षिणेकडे आहेत त्या देशांत कोरोनाचा हाहाकार माजला आहे. 117 देशांतील आकडेवारीवरून हे संशोधन करण्यात आले आहे.

एक अक्षांशाने पुढे गेल्यानंतर 4.3 टक्क्यांनी कोरोना रुग्णसंख्येत वाढ

अक्षांश रेषांचाही कोरोना रुग्णसंख्येवर स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. भूमध्यापासून जसजसे एक अक्षांश आपण पुढे जातो तसतसे 10 लाख लोकांमागे 4.3 टक्के कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेजे देश भूमध्य रेषेच्या जवळ आहेत तिथे 33 टक्क्यांपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या अन्य देशांच्या तुलनेत कमी आहे. सूर्यामधून निघणाऱया अतिनिल किरणांचा परिणाम कोरोना विषाणूवर होत असून त्यामुळे हा विषाणू कमजोर होत आहे असे या संशोधनाच्या अहवालात म्हटले आहे.

जगभरात 15.24 कोटी कोरोनाग्रस्त

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 15.24 कोटींवर पोहोचली आहे. 31.9 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून जगात सर्वाधिक 3 कोटी 24 लाख 20 हजार 918 कोरोनाग्रस्तांची नोंद अमेरिकेत झाली असून 5 लाख 77 हजार 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील या आकडेवारीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले असून कोरोनापासून लवकरच सुटका होईल असा आशावादही वर्तविण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या