युद्ध कोरोनाशी…आरबीआयचे कर्मचारी घरातून काम करणार

284

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्मचाऱयांना घरातून काम करण्यास परवानगी दिली आहे. 19 मार्चपासून 31 मार्चपर्यंत कर्मचाऱयांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने 50 टक्के कर्मचारी उपस्थितीबाबत दिलेल्या आदेशाची रिझर्व्ह बँकेने गंभीर दखल घेतली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने कंबर कसली

कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मंत्रालयातर्फे गुरुवारी सरकारच्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. कोरोनाने कहर माजवलेल्या इराणमधून 590 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अजून इराणमध्येच असलेल्या हिंदुस्थानींची तेथे विशेष काळजी घेतली जात आहे.

गुजरातचा गांधी आश्रम, मेघालयची पर्यटनस्थळे बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादेतील गांधी आश्रम 29 मार्चपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. गुजरातच्या इतिहासात पहिल्यांदाच गांधी आश्रम 10 दिवसांसाठी बंद राहणार आहे. तसेच मेघालयातील सर्व पर्यटनस्थळे 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचा फैलाव आटोक्यात न आल्यास ही मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवली जाणार आहे.

सपा, नॅशनल कॉन्फरन्सचे राजकीय कार्यक्रम रद्द

समाजवादी पार्टी आणि नॅशनल कॉन्फरन्सने कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून आपले सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित केले आहेत. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे कश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने कश्मीर खोऱयातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या