
सोशल मीडिया कधी कोणाचा गेम करेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियाच्या वणव्यात सध्या चिकन विक्रेते जबरदस्त भरडले गेले आहेत. लातूर जिल्ह्यातील 60 टक्के लोकांनी चिकन खाणे बंद केले असून यामुळे चिकनचा बाजारच उठला आहे. कोरोना व्हायरस चिकनमधून येत असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवली गेली आणि लोकांनी मांसाहार बंद केला आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यात मांसाहार करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. शहरासह जिल्ह्यात मोठ्या संख्येने हॉटेल्स, धाबे, खानावळींची रेलचेल आहे. एवढी संख्या मराठवाड्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यात नसावी. लातूर जिल्ह्यात दररोज किमान 31 ते 35 टन चिकन खाल्ले जात होते. चीन मधिल नोव्हेल कोरोना व्हायरसचा धसका सगळ्या जगाने घेतलेला आहे. चीन मधील कोंबड्या मारण्यात येत असल्याचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून चिकनमुळेच कोरोना व्हायरस पसरत असल्याचे सोशल मीडियावर फिरु लागले.
या धसक्याने लोकांनी मांसाहार करणेच बंद केले आहे. लातूर जिल्ह्यात रविवार आणि मंगळवार हे दोन दिवस मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो. या दिवशी चिकनचा खप डबल होतो. शहरात दररोज किमान 10 ते 12 टन चिकन फस्त केले जाते तर जिल्हाभरात 31 ते 35 टन चिकन फस्त होते. मात्र कोरोनाच्या धसक्याने हा बाजारच उठला आहे. तब्बल 60 टक्के लोकांनी मांसाहाराकडेच पाठ फिरवली आहे. त्यामुळे या व्यवसासिकांचे तगडे आर्थीक नुकसान होत आहे. आज जीवंत पक्षी केवळ 35 ते 40 रुपयांना विकावा लागत आहे. जेंव्हा की उत्पादन खर्च किमान 75 रुपये आहे. छोटे पिल्लू पूर्वी 20 ते 22 रुपयांना विकले जात होते ते आता केवळ 10 ते 12 रुपयांना विकले जात आहे.

चिकनमुळे नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रसार होत नाही अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन शासकीय अधिकाऱ्यांच्यावतीने (सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग ) पोल्ट्री व्यवसायीकांना देण्यात आली. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर कोरोना व्हायरस चिकन खाल्यामुळे होत असल्याचे खोटे पसरवले जात असून संबंधितांवर पोलीसांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेस पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त डॉ. नानासाहेब कदम, चिकन विक्रेता, पोल्ट्री व्यावसायिक डॉ. विजय कदम, जाफर शेख, रफिक सय्यद, मोबीज शेख यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.






























































