कोरोनामुळे आयपीएलला ‘पंच’ मिळेनात, बीसीसीआयला सांगण्यात आला नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या काळात बीसीसीआयने आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेतला खरा पण त्यांना पदोपदी अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. आयपीएलशी संबंधित असणाऱया सर्वांच्याच आरोग्याची व सुरक्षेसाठी व्यवस्था, कोरोना चाचणीचा खर्च, विविध माध्यमांतून सहन करावा लागणारा आर्थिक तोटा, मायदेशाऐवजी परदेशात खेळवावी लागणारी स्पर्धा या सर्व बाबींसह आणखी एका अडचणीचा सामना आता बीसीसीआयला करावा लागला आहे. कोरोनामुळे आयपीएलला पंच मिळेनासे झाले आहेत. आयसीसीच्या एलिट पॅनेलमधील बहुतांशी पंचांनी आयपीएलमध्ये ‘पंचगिरी’ करण्यास नकार सांगितला आहे. त्यामुळे बीसीसीआयसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. अशा प्रकारचे वृत्त एका इंग्रजी दैनिकामधून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दरवर्षी बीसीसीआयकडून आयसीसी एलिट पॅनेलमधील सहा आंतरराष्ट्रीय पंचांची नियुक्ती आयपीएलसाठी करण्यात येते. आता या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत नाही आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये खरे तर जास्त एलिट पंच असायला हवेत. पण फक्त तीनच परदेशी पंचांनी आयपीएलसाठी होकार सांगितला आहे. न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी, इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ व मायकेल गॉफ यांच्यासह हिंदुस्थानचे नितीन मेनन यांनी आयपीएलसाठी थम्स अप दाखवला आहे. तसेच हिंदुस्थानचे जवागल श्रीनाथ यांनीही सामनाधिकारी म्हणून काम करण्यास होकार दाखवला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय पॅनेल पंचांपैकी अनिल चौधरी, सी शम्सहुद्दीन, वीरेंदर शर्मा, के. एन. अनंत, एस. रवी. यांनाही आयपीएलसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. टीव्ही अंपायर व मैदानातील पंचांसाठी 12 पंच उत्सुक असून चौथा पंच म्हणून कामगिरी करण्यासाठी तीनच पंच तयार झाले आहेत.

आयसीसीकडून मोठे पॅकेज

आयसीसीच्या एलिट पॅनेलमधील पंचांशी मोठय़ा रकमेचा करार करण्यात येतो. त्यामुळे कोरोनाच्या काळातही या पॅनेलमधील पंच ‘जॉब लेस’ नाहीत. त्यामुळे कोरोनामध्ये यूएईत जाऊन आयपीएल खेळण्याची ‘रिस्क’ काही पंच घेत नाहीत, असा सूर क्रिकेटवर्तुळातून निघू लागला आहे.