
कोरोना महामारीच्या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. या कर्मचारी कपातीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत असताना कंपन्यांच्या या कारवाईवर प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी कडाडून टीका केली आहे. कोरोनाच्या कठीण प्रसंगी कर्मचाऱ्यांच्या प्रति तुमची काही जबाबदारी असते. ज्यांनी तुमच्यासाठी काम केले, त्यांनाच तुम्ही असे वाऱ्यावर सोडून दिले. हीच का तुमची नैतिकता, अशा शब्दांत टाटा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उद्योजक रतन टाटा यांनी नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान ही नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी कर्मचारी कपातीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, उद्योग आणि कंपन्यांसाठी ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून काम केले, चांगले प्रदर्शन केले त्यांच्या प्रति संवेदनशीलतेची गरज आहे. महामारीच्या प्रसंगी या कर्मचाऱ्यांबरोबर असे वागणे हीच का तुमची नैतिकता अशा स्पष्ट शब्दात त्यांनी कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांना खडे बोल सुनाविले आहेत.
ते पुढे म्हणाले, ज्यावेळी देशात कोरोना विषाणूचा प्रकोप सुरु झाला होता. त्यावेळी हजारोंना नोकरीवरुन काढण्यात आले. यामुळे समस्या सुटणार आहे का? मला नाही वाटत यामुळे समस्या सुटू शकते. तुम्हांला नुकसान झाले आहे, अशावेळी लोकांना कामावरुन काढून टाकणे हे चुकीचे आहे. याउलट त्यांच्या प्रती तुमची जबाबदारी वाढते, अशा शब्दात त्यांनी कंपन्यांचे कान टोचले आहेत.
असे करणारे तुम्ही कोण?
कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये श्रमिक मजुरांना त्यांच्या घरी परतावे लागले. यावरदेखील त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. देशाच्या सर्वात मोठ्या श्रमशक्तीला तुमच्याकडे काम नसल्याने तुम्ही परत जाण्यास भाग पाडले. त्यांच्यासाठी खाण्यापिण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. असे करणारे तुम्ही कोण, असा सवालदेखील रतन टाटा यांनी उपस्थित केला. तर अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, अशी इच्छादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.






























































