‘कल्याण’मध्ये लॉकडाऊनची ऐशी की तैशी!

1767

‘कोरोना’ चे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असतानाच कल्याण शहरात मात्र  ‘लॉक डाऊन’ ची ऐशी की तैशी  करण्यात आली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये ,सुरक्षेचे नियम पाळावेत असे वारंवार आवाहन करूनही अनेक ठिकाणी लोक कारण नसताना रस्त्यावर फिरत असल्याचे आढळून आले आहे.  विशेष म्हणजे झोपडपट्टी भागात  काही  टारगट मुले झुंडीने फिरत असून अनेक ठिकाणी तर क्रिकेट देखील खेळले जात आहे. या अतिउत्साही तरुणांना तातडीने समज द्या, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

कोरोना मुळे सगळीकडे लॉक डाऊन आहे. पण कल्याणच्या इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी त्याचा फज्जा उडवल्याचे चित्र दिसत आहे. पौर्णिमा टॉकीजहून बिर्ला कॉलेज कडे येताना इंदिरा नगर  ही  झोपडपट्टी लागते. या झोपडट्टीवासीयांना कोरोनाचे भयच राहिलेले नाही .या परिसरात दिवसभर लोकांचा राबता असतो. रस्त्यावर फिरणारी मंडळी मास्कचा देखील  वापर करीत नाहीत . पोलिस आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हे सध्याच्या काळात घातक ठरण्याची शक्यता आहे .

पोलिसांची गस्त वाढवा
            
कल्याण स्टेशन जवळ असलेल्या जोशीबाग या परिसरात देखील काहीशी अशीच परिस्थिती दिसून येत आहे. सुमारे पंचवीस हजारांची ही वस्ती असून येथे दिवस-रात्र लोकांची वर्दळ दिसून येते.  कोणतेही कारण नसताना अनेक मुले रस्त्यावर घराबाहेर असल्याचे आढळून येत आहे.  आझादनगर  येथेही सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे चालू आहेत. लोक घराच्या बाहेर आरामात बसल्याचे दिसून येत असून काही टारगट मुले तर गटागटाने नाक्यांवर  गप्पांच्या मैफली झोडत असल्याचे लक्षात येते. या भागात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या