कोरोना संशयित विद्यार्थ्यांचीही जेईई, नीट परीक्षा बुडणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
exam-papers
प्रातिनिधिक फोटो

पुढील महिन्यात होणाऱया ‘जेईई-मेन’ आणि ‘नीट’ परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. परीक्षाकाळात कोरोना संसर्ग टाळतानाच परीक्षा सुरळीत पार पडव्यात यासाठी नियमावली बनवली आहे. तपासणीवेळी कोरोना संशयित आढळला तरी विद्यार्थ्याची परीक्षा बुडणार नाही याची काळजी एनटीएने घेतली असून अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आयसोलेटेड वर्गांमध्ये बसवले जाणार आहे.

इंजिनियरींग प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई-मेन परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे तर मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘नीट’ परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. कोरोना संसर्ग टाळता यावा म्हणून राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) परीक्षेच्या वेळी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे आणि पुढील व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

  • परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना नवा मास्क द्या. जुना मास्क नष्ट करण्याची व्यवस्था करावी.
  • प्रवेशद्वारावरच प्रत्येक विद्यार्थी आणि कर्मचाऱयाची थर्मे गनने तपासणी करावी
  • कोरोनाची लक्षणे असलेल्या विद्यार्थी, कर्मचाऱयांना स्कतंत्र आयसोलेटेड वर्गांमध्ये बसवावे.
  • कोरोनासदृष लक्षणे नाहीत आणि आपण कोणत्याही कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेलो नाही असे हमीपत्र प्रत्येकाकडून घ्यावे.
  • कोरोना संदर्भात दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये.
  • परीक्षा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेशाची वेगवेगळी वेळ द्यावी.