मोटरसायकलवर संसार घेऊन कामगारांचा गोवा ते राजस्थान प्रवास

284

गोवा राज्यात अडकलेले राजस्थान मधील 10 ते 15 परप्रांतीय कामगार गुरूवारी रात्री मुंबई – गोवा महामार्गावरून मोटरसायकलने आपल्या बायको, लहान मुलाबाळांसह संपूर्ण आपला संसार घेऊन सिंधुदुर्ग मार्गे राजस्थानच्या दिशेने रवाना झाले. यातील पावशीत बंद पडलेली एक मोटरसायकल स्थानिक ग्रामस्थांनी मॅकेनिकलच्या मदतीने दुरुस्त करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय कामगार ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. शासनाने परराज्यांत अडकून पडलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचा निर्माण घेतला असतानाही अनेक परप्रांतीय कामगार, मजूर व त्यांची कुटुंबे शेकडो किमी अंतर पायी चालत गावाच्या दिशेने जात आहेत. लाॅकडाऊन काळात गोवा राज्यात अडकलेले उत्तरप्रदेश आणि राजस्थान मधील परप्रांतीय कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी सिंधुदुर्ग मार्गे मुंबई गोवा महामार्गाने शेकडो कि.मी.अंतर पायी चालत वाट धरली आहे. गोवा राज्यात अडकलेले राजस्थान मधील परप्रांतीयांनी गुरूवारी रात्री मोटरसायकलवरून आपला संसार घेऊन सिंधुदुर्ग मार्गे राजस्थानची वाट धरली. गोव्यात उसाचा रस विक्री व अन्य कामे करणाऱ्या या परप्रांतीयांनी बायको, मुलांसह संपूर्ण संसाराचे गाठोडे घेऊन मोटरसायकलने प्रवास सुरू केला. जवळपास 10 ते 15 मोटरसायकल घेऊन पुरुष, महीला व लहान मुले असे 30 ते 35 जण कुडाळहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यातील 10 मोटरसायकलचा ग्रुप रात्री पावशी कुंभारवाडी येथे आला असता एक मोटरसायकल अचानक रस्त्यातच बंद पडली. रात्रीच्या वेळी ती दुरूस्त कशी करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. लागलीच स्थानिक ग्रामस्थांनी या परप्रांतीयांची आपुलकीने विचारपूस करत मेकॅनिकलला बोलावून घेत ती मोटरसायकल दुरूस्त करून दिली. याबाबत त्या परप्रांतीय कुटुंबांनी ग्रामस्थांचे आभार मानत राजस्थानच्या दिशेने प्रवास सुरू केला. या परप्रांतीयांनी गोवा प्रशासनाकडून गावी जाण्यासाठी पास घेतला असल्याचे यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या