
कोरोना काळात पाहुण्यांच्या मर्यादित संख्येमुळे लोक लग्नसोहळ्यांवर कमी खर्च करत आहेत. लग्नमंडप आणि कॅटरिंगच्या खर्चातदेखील कपात करत आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबांचा लग्न खर्च 30 ते 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. शाही लग्नातही सेलिब्रेटी, गायक आता दिसत नाहीत.
परदेशात वेडिंग डेस्टिनेशनवर जाऊन लग्न करण्याचा ट्रेंड अलीकडच्या काळात निर्माण झाला आहे. या वर्षी मात्र परदेशांत लग्न करण्याऐवजी देशातच केले जात आहे. देशांतर्गतही वेडिंग डेस्टिनेशनला जे लोक प्राधान्य देत होते, ते आता स्थानिक ठिकाणीच विवाह सोहळे उरकून घेत आहेत. मोठय़ा विवाहसोहळ्यांमध्ये कलाकार, गायक आता येत नाहीत, अशी माहिती शीयर मॅनेजमेंट ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख अजय प्रजापती यांनी दिली.
पाहुण्यांची संख्या कमी झाल्याने हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये विवाह होत आहेत. पूर्वी थाटात होणाऱया लग्नात 500 पाहुण्यांवर दीड ते दोन कोटी रुपये खर्च होत असत. पण आता 50 पाहुण्यांमुळे खर्च सुमारे 80 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील लग्नाचा खर्च 30 ते 50 टक्के कमी झाला.
जुन्या दागिन्यांचे नवे दागिने
लॉकडाऊननंतर एक्स्चेंज दागिने जास्त वापरले जात आहेत. सुमारे 50टक्के लग्नांतील दागिने जुन्या दागिन्यांपासून बनवले जात आहेत. तरीही लग्नांत सुमारे 350-400 टन सोन्याचे नवे दागिने बनवले गेले आहेत, अशी माहिती इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी दिली.
- देशात दरवर्षी सुमारे 90 लाख ते एक कोटी विवाह होतात.
- देशात 3 लाखांपेक्षा जास्त वेडिंग प्लॅनर आहेत.
- हिंदुस्थानी आपल्या बचतीचा 30टक्के भाग लग्नावर खर्च करतात.
- वर्ष 2020 च्या अखेरपर्यंत देशात ऑनलाइन मॅट्रिमोनियल सर्चची बाजारपेठ सहा हजार कोटी रुपयांची होईल, अशी अपेक्षा आहे.
- दरवर्षी 20 टक्के व्यावसायिक वाढ वेडिंग इंडस्ट्रीत होत आहे.






























































