नैराश्य दूर होऊन वाढतंय ‘मनोबल’! कोरोना काळात मानसमित्र देतायत आधार

आपण कोरोनाच्या दुसऱया लाटेचा तडाखा झेलत आहोत. कोरोनाच्या साथीमुळे अस्वस्थ, बैचेन झालो आहेत. मानसिक ताणतणाव वाढू लागला आहे. या परिस्थितीत मनोबल हेल्पलाइनच्या माध्यमातून मानसमित्र आणि मैत्रिणी अनेकांना भावनिक आधार देण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत. गेल्या वर्षभरापासून हा उपक्रम सुरू असून मानसिक प्रथमोपचाराच्या या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लोकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी परिवर्तन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समिती या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मनोबल हेल्पलाईन उपक्रम डॉ. हमीद दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे. गेल्या वर्षी, एप्रिल महिन्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत या उपक्रमाला सुरुवात झाली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांना केवळ एक फोन करून ही सुविधा मिळू शकते. ही सेवा मोफत असून कॉल करणाऱयाची माहिती गोपनीय ठेवण्यात येते.

कोरोनामुळे अस्वस्थता, भीती, निराशा अशी भावना दाटून येत असेल तर अशा लोकांचे हेल्पलाइनच्या माध्यमातून समुपदेशन केले जात आहे. यासाठी मानसमित्र बनण्यास इच्छुक असणाऱयांना आवाहन करण्यात आले. त्यानंतर परिवर्तन संस्थेतर्फे 250 ते 300 जणांना मानसिक प्रथमोपचाराचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना हेल्पलाईन नंबर देण्यात आले. तीन महिने हेल्पलाईन भरघोस प्रतिसाद मिळाला. या काळात अनेकांचे समुपदेश करण्यात मानसमित्रांना यश आले. प्रत्येक मानसमित्राने सुमारे 50 जणांचे तरी समुपदेशन या काळात केले. पुढे कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर हेल्पलाईनवर कॉल करण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेत मनोबल हेल्पलाईन पुन्हा सक्रिय झाली आहे.

मन मोकळं करावंसं वाटतंय…

मनोबल हेल्पलाइनच्या प्रशिक्षित मानसमित्र आणि मैत्रिणींचे नंबर त्यांच्या गावासहित देण्यात आले आहेत. कोरोना काळात मुंबई, पालघर, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, धाराशीव, नगर, नाशिक, संभाजीनगर, रायगड अशा विविध ठिकाणी मानसमित्र कार्यरत आहेत. त्यांचे काही नंबर याप्रमाणे-

  • मुंबई – डॉ. वंदना कामत 7678074866/, अक्षिता पाटील 9967753696,
  • रत्नागिरी – उल्का पुरोहित 9326678782/सीमा कदम 9226575241
  • पुणे – अण्णा कडलासकर- 9270020621
  • नाशिक – योगेश अहिरे 9881290264

याशिवाय परिवर्तन संस्थेतर्फे मनोबल आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन चालवली जात असून तिचा नंबर 7412040300 आहे.

मनावर उपचार करणे म्हणजे माणूस वेडा झाला आहे, असे आपल्याकडे समजले जाते. याबाबत अधिकाधिक जनजागृती करणे गरजेचे आहे. मानसोपचार म्हणजे कलंक नाही, हे लोकांना पटवून दिले पाहिजे. यासाठी आम्ही 70-80 मानसमित्रांना ऍडव्हान्स प्रशिक्षण दिले आहे. ते आता उत्तम समन्वयाचे काम करत असून त्यांच्या मदतीने आम्ही राज्यभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. – कृतार्थ शेगावकर, परिवर्तन, पुणे

सतत एकाच गोष्टीचा विचार करून माणूस घाबरून जातो. त्याच त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो. मग आम्ही त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला सांगतो. संगीत ऐकायला सांगतो. बातम्या बघाव्या, पण अतिरंजित बातम्या बघू नका, असा सल्ला देतो. मानसमित्र समुपदेशनाची सुरुवात मी माझ्या कुटुंबापासून केली. माझ्या कुटुंबातील एका सदस्याचे व्यसन सोडवू शकले. – उल्का पुरोहित, प्रशिक्षित मानसमित्र

आपली प्रतिक्रिया द्या