
लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या रंगभूमीवरील पडद्यामागच्या कलाकारांसाठी युवा सेना धावली आहे. शिवाजी मंदिर दादर, दीनानाथ पार्ले, दामोदर हॉलसह मुंबईतील अनेक नाट्यगृहांमधील कर्मचारी-कामगारांना युवा सेनेच्या वतीने किराणा सामानाचे मोफत वाटप करण्यात आले. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार आणि अभिनेता सलमान खान यांच्या ‘बिईंग ह्युमन’ यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला.
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनला आता अडीच महिना होत आला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व थिएटर, नाट्यगृह बंद असल्याने या ठिकाणी काम करणार्या शेकडो कर्मचार्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर युवा सेना आणि पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले आणि कार्यकारिणी सदस्य राहुल कनाल यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये मुंबईतील रंगभूमीच्या पडद्यामागच्या कलाकारांची नाट्यगृहावर भेट घेऊन त्यांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. कोणतेही संकट आले तरी युवा सेना बॅक स्टेज आर्टिस्टच्या मागे ठाम उभी राहील असा विश्वास त्यांना देण्यात आला. लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या शेकडो कर्मचारी-कामगारांना युवा सेनेच्या या उपक्रमामुळे मोठा आधार मिळाला आहे.






























































