सामान्य नागरिकांना पेट्रोल, डिझेल विक्रीस बंदी; बीड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

petrol-diesel

देशभरात 21 दिवस लॉकडाऊन केले गेले आहे. मात्र काही जण रस्त्यावर आपले वाहन कारण नसतांना घेऊन फिरत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. याआधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल वितरण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना पेट्रोल आणि डिझेल देऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. हे आदेश मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरस देशात झपाट्याने फैलावत असल्याने देश 21 दिवस लॉक डाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. तसेच बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी देखील काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल विक्री करण्यावर बंदी घातली आहे. अत्यावश्यक सेवा ज्यामध्ये पाणी पुरवठा करणारी वाहने, मेडिकल, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे वाहने, शासकीय पुरवठा करणारी वाहने यांना पेट्रोल डिझेल देण्यात येईल. त्याव्यतिरिक्त सामान्य नागरिकांना मिळणार नाही असे आदेशात म्हंटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या