कोरोनाच्या भीतीने क्वारंटाईन सेंटरमध्ये एकाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने सिन्नर तालुक्यातील भोकणी येथील शाळेत क्वारंटाईन असताना मंगळवारी पहाटे संसर्गाच्या भीतीमुळे 57वर्षीय जाखू बाळू मेंगाळ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दोडी येथील 57वर्षीय जाखू बाळू मेंगाळ हे काविळीवरील औषध देण्यासाठी परिसरात प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे 12 जून रोजी एकजण काविळीवरील औषध घेण्यासाठी आले होते. संबंधित व्यक्ती 13 जूनला कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. त्यामुळे मेंगाळ यांच्यासह कुटुंबातील बाराजणांना भोकणी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते.

मेंगाळ यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे अद्याप त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेतला नव्हता. मात्र, आपल्याला कोरोना झाला असावा या भीतीपोटी मंगळवारी पहाटे पाच वाजता त्यांनी शाळेत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.