
देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा देशाच्या विज्ञान सल्लागारांनी दिला आहे. पण या लाटेविरोधात राज्य सरकारने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. राज्य ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण करीत असून रेमडेसिवीरचा पुरवठाही वाढवत आहोत. त्याचप्रमाणे वाडय़ा, वस्त्यांमधील फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधून त्यांना टास्क फोर्सच्या डॉक्टरांकडून मार्गदर्शन देत आहोत. आपल्याला दुसरी लाट थोपवायची आहे, पण तिसरी लाटसुद्धा जर आली तर घातक दुष्परिणाम आपल्या राज्यावर होऊ द्यायचा नाही हा चंग बांधून आपले सरकार काम करीत आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधतानाच कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱया उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई व महाराष्ट्रात, खासकरून मुंबईत जी कोरोनाची लढाई लढतोय त्याचे काैतुक केले आहे. पण हे केवळ एकटय़ा यंत्रणेचे यश नाही, तर हे जनतेचेही यश आहे. जनतेचा सहभाग या लढय़ात मिळाला नसता तर हा लढा लढता आला नसता. आपण अत्यंत संयमाने, जिद्दीने व शिस्तीने या लढय़ात सरकार व मुंबई महानगरपालिकेला मदत करीत आहात, असे सांगतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.
महाराष्ट्राला ऑक्सिजन स्वयंपूर्ण करणार – तीन हजार मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन निर्मिती
केंद्र सरकारच्या विज्ञानविषयक सल्लागारांनी तिसऱया लाटेचा इशारा दिला आहे. सावध राहण्याचा इशारा दिला आहे. पण तिसऱया लाटेविरोधात आपण आधीच तयारी सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्रात ऑक्सिजनची निर्मिती तीन हजार मेट्रिक टनपर्यंत न्यायची आहे. म्हणजे 1800 मेट्रिक टन अधिक ऑक्सिजन आपल्याला उत्पादन केलाच पाहिजे हा आपला कटाक्ष आहे आणि त्याची सुरुवात केली आहे. त्यासाठी 300 पीएसई प्लँट उभारत आहोत. येत्या काही दिवसांत त्यातील काही कार्यरत होतील. या योजनेला आपण ‘मिशन ऑक्सिजन’ हेच नाव दिले आहे. महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाच पाहिजे हे आपले कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आपण हालचाल करीत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
रेमडेसिवीर इंजेक्शनचाही पुरवठा वाढवतोय
रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत केंद्र सरकार हळूहळू आपल्यासाठी ठरविलेला कोटा वाढवत आहे. जेवढी इंजेक्शनची आवश्यकता आहे तोपर्यंत आपण पोहोचलेलो नाही. रेमडेसिवीरचा पुरवठा आवश्यकतेनुसार प्रत्येक जिह्याला करीत आहोत. त्यामध्ये इंजेक्शन मिळत नाही ही लोकांची तक्रार आहे. ऑक्सिजनपासून रेमडेसिवीरबाबत आपण स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
फॅमिली डॉक्टर्सना टास्क फोर्सकडून मार्गदर्शन
आपण कालपासून टास्क फोर्समार्फत संबंधित जिल्हा व शहरातील फॅमिली डॉक्टर्सना झूम कॉलवर एकत्र करून मार्गदर्शन करायला सुरुवात केली. रुग्णाला कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर कोणत्या रुग्णाला रुग्णालयात नेण्याची गरज आहे, कोणत्या रुग्णाला होम क्वारंटाइन करायचे? यातला नेमका फरक कसा ओळखायचा. रुग्ण घरी असेल तर घरच्या घरी कोणती औषधे द्यावीत व कोणती औषधे देऊ नयेत याचे संपूर्ण मार्गदर्शन आपल्या राज्यातील वाडय़ा, वस्त्या व गल्लीबोळातील जे डॉक्टर्स वर्षानुवर्षे प्रॅक्टिस करीत आहेत, वस्तीसाठी आधार म्हणून काम करीत आहेत त्यांना दिले जाणार आहे. त्या सर्वांना सोबत घेऊन आपण पुढे जात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
- आरोग्य व्यवस्थेत वाढ करीत आहोत. आपण आयसोलेशन बेड जवळपास साडेचार लाखांपर्यंत नेले आहेत. एक लाख ऑक्सिजन बेड आहेत. तीस हजारांच्या आसपास आयसीयू बेड आहेत आणि 12 हजारांच्या आसपास व्हेंटिलेटर आहेत. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी मंजुरी दिली आहे.
धोक्याच्या वळणावर आहोत
आपण जे काही निर्बंध लावले आहेत त्यामुळे रुग्ण वाढ किंचित थांबली आहे. 25 एप्रिलला राज्यात 6 लाख 98 हजार सक्रिय रुग्ण होते. तर 4 मे रोजी राज्यात 6 लाख 41 हजार 900 इतकी रुग्णवाढ थोपवून रुग्णवाढ खाली आणली आहे. ही लढाई आपण जिंकतो असे वाटत असले तरी ही लढाई अजून जिंकलेलो नाही. अजूनही गाफीलपणा परवडणारा नाही. खरे तर आपण एका धोक्याच्या वळणावर आलो आहोत. राज्यातल्या काही जिह्यांमध्ये रुग्णवाढ उताराला लागली असली तरी काही जिह्यांत ती वाढत आहे. त्या जिह्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. इतर देशांत काय चालले आहे याच्या बातम्या आपण वाचत आहोत. आपण निर्बंध लादून किंवा ते पाळून दुसऱया लाटेशी लढत आहोत. अन्य राज्यही आता लॉकडाऊन करीत आहेत. आपल्यासारखेच निर्बंध लादत आहे. कारण आता कोरोनाच्या लढय़ातील आवश्यकता बनली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
लस पुरवठा वाढेल तसे लसीकरणही वाढवू
18 ते 44 वयोगटातील सहा कोटी नागरिकांना लसीकरण करण्याची केंद्राने टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडीत आहोत. या वयोगटातील नागरिकांच्या 12 कोटी डोससाठीची किंमत एकरकमी चेकने देण्याची राज्याची तयारी आहे. जसजसा लस पुरवठा होईल तसा लसीकरणाचा वेग वाढेल. पाच लाख लोकांचे लसीकरण आपण एका दिवसात करून दाखवले आहे. ते दहा लाखांपर्यंत नेण्याची आपली क्षमता आहे. ज्या प्रमाणात लसींचे उत्पादन वाढत आहे त्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत आहे. म्हणून तूर्त आपली क्षमता व मर्यादा या दोन टोकाच्या गोष्टी झालेल्या आहेत. जसा लस पुरवठा वाढेल तसे लसीकरणही आपण वाढवू, अशी आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.
दररोज 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज
आपल्या राज्यात दररोज बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करतो. पण आत सतराशे मेट्रिक टन ऑक्सिजनची दररोज गरज भासत आहे. ऑक्सिजनसाठी आपण केंद्र सरकारला आणखी एक पत्र दिले असून 200 मेट्रिक टन ऑक्सिजनची केंद्राकडे मागणी केली आहे. उर्वरित मागणीपैकी 500 मेट्रिक टन केंद्र सरकार आपल्याला सध्या इतर राज्यांतून देत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.






























































