
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले… महाराष्ट्र मरू शकत नाही, महाराष्ट्र कुणी मारू शकत नाही. जो महाराष्ट्राला मारायला येईल त्याला मारल्याशिवाय महाराष्ट्र राहत नाही, हे दाखवण्याची वेळ आली आहे. ही एकजूट केली आहे ती तेवढ्यासाठीच आहे!
विकासाची भाषा करणाऱया, राष्ट्र प्रथम म्हणणाऱया भाजपसाठी आता भ्रष्ट प्रथम, गुंड प्रथम झाला आहे, असा घणाघात करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप आणि फडणवीसांवर हल्ला चढवला. मराठी माणसासासाठी, मुंबई वाचवण्यासाठी आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत. भावकी एक झाली आता गावकीही एक होतेय, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
शिवतीर्थावरील विराट सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. भाजपच्या भ्रष्टाचाराची त्यांनी लक्तरेच काढली. ते म्हणाले की, ‘भाजपला एका वर्षात 3100 कोटी रुपये निधी मिळाला. राज्य आणि केंद्र सरकार भाजपचे आहे, पण मुंबई महापालिकेला विविध करांच्या माध्यमातून जवळपास 11 हजार कोटी रुपये थकबाकी येणे बाकी आहे. भाजपवाले स्वतःची खाती भरत आहेत आणि मुंबई लुटत आहेत. महापालिकेच्या 92 हजार कोटींच्या ठेवी त्यांनी मोडून टाकल्या. दुसरीकडे नवी मुंबई महानगरपालिका कर्जबाजारी झाली असल्याची बोंब भाजपचेच गणेश नाईक मारत आहेत,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपशासित राज्यातील एक शहर तरी असे दाखवा जे मुंबईशी बरोबरी करत असेल तर आपण काहीही हरायला तयार आहोत, असेही ते पुढे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भावकी एक झाली आहे असा उल्लेख व्यासपीठावरील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्यासोबतच्या फोटोचा दाखला देत यावेळी केला. त्यावर भावकी एक झाली आहे आता गावकी पण एक होत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. लाचार माकडे कधी वाघ बनू शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी गद्दारांना लगावला.
फडणवीसांनी व्यासपीठावर येऊन मुंबईबद्दल चर्चा करावी
फडणवीस यांनी आजही व्यासपीठावर येऊन मुंबईत केलेल्या कामांबद्दल आदित्य ठाकरे यांच्यासमोर चर्चा करावी, असे आव्हान यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गद्दार गॅंगवरही फटकारे ओढले. शिवसेनेनेच त्यांना महानगरपालिका दाखवली आणि गद्दाराला मंत्री करण्याचे पाप आपल्या हातून घडले, हे अभिमानाने नाही शरमेने सांगावे लागते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महानगरपालिकेची निवडणूक आहे. पूर्वी रोम्बासोम्बा नावाचा अश्लील डान्स होता. लोकांच्या विरोधानंतर तो बंद झाला. पण प्रत्येक निवडणूक आल्यावर भाजपवाले रोम्बासोम्बा करतात तसाच आताही सुरू आहे, असा मिश्कील टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केले.
दो कवडीके मोल मराठा बिकनेको तैयार नही
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या आठवणीही यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी जागृत केल्या. ते म्हणाले की, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी मोरारजी देसाई नावाच्या नरराक्षसाने आंदोलकांना दिसताक्षणी गोळ्या घाला असे आदेश दिले होते. ते मोरारजी देसाई हिंदूच होते व मरणारे सर्व मराठी होते. तेव्हा जनसंघ कुठेही नव्हता. गोळीला तुम्ही, पोळीला आम्ही ही भाजपची वृत्ती आहे. त्या सगळ्या लढयात अण्णाभाऊ साठे होते, शाहीर अमरशेख होते. दो कवडी के मोल मराठा बिकनेको तयार नाही असे अमरशेखांनी दिल्लीश्वरांना ठणकावून सांगितले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दीड वर्षापूर्वी बदलापूरमध्ये चिमुकलीवर शाळेत अत्याचार झाले होते. त्याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एनकाऊंटर केला गेला. या प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला बदलापूर निवडणूकीत चांगले काम केले म्हणून भाजपने स्वीकृत नगरसेवक केला. राष्ट्रप्रथम असलेला भाजप आम्हाला काही काळ आपला वाटत होता. पण आता त्यांनी सलीम कुत्ताच्या साथीदाराला सोबत घेतले. इक्बाल मिर्चीशी संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेलांना सोबत घेतले. आता हा भाजप दरोडेखोर, बलात्कारी प्रथम असा झाला आहे, असे टीकास्त्रही उद्धव ठाकरे यांनी सोडले.
मुंबईच्या प्रदूषणात अदानींचे सिमेंट
आज संपूर्ण मुंबई खोदून ठेवली आहे. एका पर्यावरण तज्ञाने सांगितलं की दिल्ली व्हेंटिलेटरवर आहे तर मुंबई आयसीयूमध्ये आहे. उद्या आपण जगायचे कसे हे ठरवणारी ही निवडणूक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. संपूर्ण मुंबई खोदलेली आहे. इकडे खड्डे, तिकडून बोगदा, इकडून मेट्रो, तिकडून फुटपाथ खोदलाय. संपूर्ण मुंबईत धूळ सिमेंटचे साम्राज्य आहे. त्या प्रदूषणातही भ्रष्टाचार आहे. कारण या सर्व कामांसाठी वापरले जाणारे 50 टक्के सिमेंट अदानीच्या कंपनीकडून खरेदी केले जातेय, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेना-मनसेने कुणाला घाबरवण्यासाठी युती केलेली नाही. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाला दादागिरी करतायत त्यांच्याविरुद्ध आवाज उठवायचा नाही तर लेंडय़ा टाकायच्या का? आम्हाला एक मराठी माणूस दाखवा परराज्यात जाऊन दादागिरी करतोय. उभा चिरून टाकतील त्याला.
…तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या
उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उदाहरणही दिले. अजित पवार यांनी 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावेळी ढीगभर पुरावे दिले होते. आता केस चालू आहे असे म्हणत आहेत. पुरावे तुम्हीच दिले होते. मग ते पुरावे की जाळावे हे न्यायालयानेच सांगावे आणि पुरावे खरे होते तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या नसेल तर त्यांची माफी मागा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईचा घास गिळायचाय म्हणून शिवसेना नकोय
पंतप्रधान मोदींना अतिरेकी म्हणणारे चंद्राबाबू भाजपला चालतात, संघमुक्त हिंदुस्थानचा नारा देणारे नितीश कुमार चालतात, कश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती चालतात, पण शिवसेना नको आहे. कारण शिवसेना असेपर्यंत भाजपला मुंबईचा घास गिळता येणार नाही, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भाजपवाले म्हणजे मोदींचे बॅंडवाले आहेत, ते ठाकरे ब्रॅन्ड काय संपवणार? ठाकरे आम्ही एकच आहोत आणि शरद पवारही आमच्याबरोबर आहेत. ठाकरे आणि पवार ही दोन नावे पुसायचा भाजपचा डाव आहे. ते एकदा संपले की मराठी माणूस उभा राहू शकत नाही असे भाजपला वाटते, असे कारस्थानही उद्धव ठाकरे यांनी उघड केले.
फडणवीस हिंदू आहेत की नाहीत? तपासून बघा
राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असे म्हटले तर आपण हिंदू म्हणून उल्लेख केला. त्यावरून उद्या चर्चा सुरू होईल अशी शक्यता व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि फडणवीस यांच्या हिंदुत्वावर प्रहार केला. ते म्हणाले की, मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार याची सुरुवात भाजपनेच केली होती. आम्ही मराठी महापौर होणार म्हणालो होतो तर फडणवीसांनी हिंदू महापौर होईल असे म्हटले होते, मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत? असा सवाल करत, त्यांना वरून खालून तपासून पहा असे उद्धव ठाकरे म्हणताच हशा पिकला. त्यावर शब्दाबाबत गैरसमज करून घेऊ नका, त्यांचे बर्थ सर्टिफिकेट वगैरे तपासा असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
- शिवतीर्थावर झालेल्या सभेप्रसंगी रश्मी ठाकरे, राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे, शर्मिला ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते.
मेवाभाऊ… तुम्ही आम्हाला शिकवू नका
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मेवाभाऊ असा उल्लेख केला. मेवाभाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवता? सगळीकडे अदानीकरण चालले आहे. मराठी माणसाची मुंबई आहे, तिचे पुन्हा बॉम्बे करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. अण्णामलाई हा भाजपच्या मनातले काळेच बोलून गेला, असेही ते म्हणाले. आज आपण भाजपबद्दल भरपूर काही आणले आहे, पोट भरून खा असे राज ठाकरे भाषणात म्हणाले होते. तो धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘राजने इतके पोटतिडकीने सांगितल्यानंतर ती तिडीक डोक्यात गेली पाहिजे. जाणार नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही.’
ठाकरेंचे अस्तित्व ठरवणारे जन्माला आले नाहीत
‘संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे यांच्यासह पहिल्या पाच जणांमध्ये आमचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हेसुद्धा होते. ही आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा, पण मराठीचे प्रेम, मातृभाषेचे प्रेम रक्तात असावे लागते. आमच्या डोळय़ादेखत जर आमच्या घराचे, राज्याचे, भाषेचे लचके तोडले जाताना आम्ही शेपटय़ा घालून घरी बसू असे भाजपला वाटले, पण आम्ही ठाकरे बंधू आमच्यातले वाद गाडून मराठीसाठी एकत्र आलो आहोत. मराठी माणसांसाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलो आहोत,’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का? असे म्हणणाऱयांना, ठाकरेंचे अस्तित्व ठरवणारे कोणी जन्माला आले नाही, असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.






























































