
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्यासाठी आलिशान गाडय़ांची खरेदी करताना 55 ते 60 लाखांची उधळपट्टी करण्यात आली आहे. वाहन खरेदीविषयी राज्य सरकारने किमतीची मर्यादा निश्चित केली आहे, मात्र याकडे दुर्लक्ष करून कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्यासाठी फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा या महागडय़ा आलिशान गाडय़ांची खरेदी करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी युवासेना सिनेट सदस्यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या आधी झालेल्या सिनेटच्या बैठकीत युवासेनेचे सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी राज्यपाल, कॅबिनेटमंत्री यांच्यापेक्षा महागडे वाहन कुलगुरूडॉ. सुहास पेडणेकर यांनी खरेदी केल्याप्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी या प्रश्नावर थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेण्यात आली होती. मात्र आता कुलगुरूंनी कोणत्या लेखाशीर्षखाली फॉर्च्युनर गाडीची खरेदी केली आहे, याची माहिती सिनेट सदस्यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव डॉ. ओमप्रकाश गुप्ता यांनाच विचारली आहे.
विद्यार्थ्यांच्या शुल्काचा अपव्यय
मुंबई विद्यापीठामध्ये मागील काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रम निधीअभावी रखडले आहेत. अशा स्थितीत महागडय़ा गाडय़ा या खरेदी करताना विद्यापीठाने कोणत्या लेखाशीर्षखाली इतक्या महागडय़ा गाडय़ा खरेदी केल्या याविषयी कोणताही खुलासा केला नव्हता. यामुळे युवासेना सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांनी आता ओमप्रकाश गुप्ता यांच्याकडे पत्र लिहून माहिती मागविली आहे.































































