आर्थर रोड कारागृहात प्रथमोपचार, समुपदेशनाचे धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशीष बनसोडे । मुंबई

विविध कारणांमुळे आलेले नैराश्य तसेच अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या कैद्यांना त्या दलदलीतून बाहेर काढून सुजाण नागरिक बनविण्यासाठी आर्थर रोड कारागृहात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या मोहिमेंतर्गत नैराश्यग्रस्त व नशेबाज कैद्यांचे समुपदेशन करण्यात येणार असून त्यांचे माइंड फ्रेश करण्याचा प्रयत्न होणार आहे.

आर्थर रोड कारागृहात सध्या 3200 कैदी आहेत. त्यापैकी शेकडो कैदी व्यसनाधीन व नैराश्यग्रस्त आहेत. या कैद्यांना सर्वसामान्यांच्या प्रवाहात आणण्यासाठी तुरुंग प्रशासनाने दिव्याज फाऊंडेशनच्या मदतीने कारागृहात समुपदेशनाचे धडे देण्यास सुरुवात केली आहेत. नामांकित डॉक्टर व त्यांचे पथक कैद्यांचे समुपदेशन करणार आहेत. नुकत्याच या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून व्यसनाधीन व नैराश्यग्रस्त कैद्यांचे आठवडय़ातून दोन ते तीन वेळा समुपदेशन करण्यात येणार आहे. कैद्यांचे मानसिक संतुलन ठीक राहावे, त्यांना खेळ, कलेच्या माध्यमातून आनंद लुटता यावा, ते एक चांगले नागरिक बनून कारागृह बाहेर जावेत यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत असून त्याचाच एक भाग म्हणून हा नवीन उपक्रम हाती घेतला असल्याचे तुरुंगाधिकारी हर्षद अहिरराव यांनी सांगितले.

स्वतः शिका, इतरांना शिकवा

आता कैद्यांना समुपदेशन व प्रथमोपचाराचे धडे देण्यात येणार आहेत. जे कैदी या दोन्ही बाबी पटकन शिकतील व त्यातील महत्त्व ते इतरांनाही सहज आणि तितक्याच ताकदीने समजून सांगतील अशा कैद्यांना आम्ही एकत्र करणार आहोत. त्यानंतर त्यांच्याकरवी समुपदेशन आणि प्रथमोपचाराचे धडे इतर कैद्यांना देण्यात येतील, असेही अहिरराव म्हणाले.

‘पोक्सो’चे सर्वाधिक कैदी

कारागृहात दरररोज हजर होणाऱ्या कैद्यांमध्ये ‘पोक्सो’ आणि बलात्कारातील आरोपींची संख्या सर्वाधिक आहे. शिवाय 18 ते 45 वयोगटातील कैद्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे अशा कैद्यांना आम्ही प्रामुख्याने टार्गेट केल्याचे सांगण्यात आले.