कर्नाटकातील येदियुरप्पा सरकारच्या भवितव्याचा सोमवारी फैसला

1026

कर्नाटकातील भाजपच्या नेतृत्वाखालील बी. एस. येदियुरप्पा यांच्या सरकारला चार महिने झाले आहेत. या सरकारच्या भवितव्याचा फैसला सोमवारी होणार आहे. विधानसभेच्या 15 जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांची मतमोजणी सोमवारी होणार आहे. विधानसभेत बहुमतासाठी भाजपला 15 जागांपैकी 6 जागा जिंकणे आवश्यक असल्याने सोमवारी होणारी मतमोजणी भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

विधानसेभच्या 15 जागांसठी 5 डिसेंबरला झालेल्या मतदानात 67.91 मतदारांना मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी 11 केंद्रावर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार असून दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या 17 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्यानंतर या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या आमदारांच्या बंडखोरीमुळे एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार जुलै महिन्यात कोसळले होते. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन केले होते. पोटनिवडणुका झालेल्या 15 जागांपैकी 12 जागा काँग्रेसच्या तर तीन जागा जेडीएसच्या आहेत. भाजपचे सरकारला बहुमतासाठी 6 जागा जिंकणे गरजेचे आहे. 224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेत सदस्यसंख्या 208 वर आल्याने बहुमतासाठी आवश्यक असलेले 105 जागांचे संख्याबळ असल्याने भाजपने सरकार स्थापन केले होते.सद्यस्थितीत भाजपकडे 105, काँग्रेसकडे 66 तर जेडीएसच्या 34 जागा आहेत. 17 बंडखोर आमदार अपात्र ठरल्याने 15 जागांवर पोटनिवडणूक झाली आहे. तर दोन जागांबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने त्या जागांवर पोटनिवडणुका झालेल्या नाहीत.

मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर मतमोजणी केंद्राजवळ पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 15 पैकी 9 ते 12 जागा जिंकण्याचा दावा भाजपने केला आहे. तर अपात्र ठरवण्यात आलेले आमदार भाजपकडून निवडणूक लढवत असल्याने जनता त्यांना नाकारेल असा विश्वास काँग्रेस आणि जेडीएसने व्यक्त केला आहे. भाजप सरकारला बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या सहा जागांवर विजय मिळाल्यास मंत्रिमंडळ विस्ताराचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. सध्या मंत्रिमंडळात भाजपचे 18 मंत्री आहेत. ती संख्या 34 पर्यंत वाढवण्यात येऊ शकते. तर काँग्रेस आणि जेडीएस दोन्ही पक्षांत अंतर्गत कलह असूनही त्यांना या जागांवर विजय मिळाल्यास कर्नाटकात पुन्हा राजकीय नाट्य रंगण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या