बोरिवलीत देशातील पहिली ‘मोबाईल पेट’ वाहिनी

एखाद्या पाळीव प्राण्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर आता मोबाईल पेट वाहिनीद्वारे मोफत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यानुसार आज बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनीत या मोबाईल पेट वाहिनीचे उद्घाटन सेंट लुईस चर्चचे फादर रोनाल्ड फर्नांडिस यांच्या हस्ते पार पडले. देशातील हा पहिलाच उपक्रम आहे.

मुंबई शहरातील पाळीव व भटक्या प्राण्यांची वाढती संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार कसे करायचे याची चिंता प्राणीप्रेमींना असते. तसेच त्यासाठी मोठे शुल्क आकारले जाते. त्या पार्श्वभूमीवर मृत प्राण्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रभाग क्रमांक 1 च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. हॅपी बड्स फाऊंडेशन संस्थेने या व्हॅनची उभारणी केली आहे. गरजूंनी अंत्यसंस्कार वाहिनीसाठी 8976741188 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांनी केले आहे. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरदीप मोठेराव, पोलीस निरीक्षक किरण सुरसे, ईवोन डिसोझा, शाखा संघटक ज्युडीथ मेंडोसा, युवासेनेचे जितेन परमार, दर्शित कोरगावकर आदी उपस्थित होते.