देगलूर तालुक्यात प्रेमी युगूलाची आत्महत्या 

14
suicide

सामना प्रतिनिधी । देगलूर

प्रेमविवाहास घरच्यांनी विरोध दर्शविल्याने एका प्रेमी युगूलाने तलावात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास मुजळगा येथे उघडकीस आली. या घटनेमुळे मुजळगा गावावर शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील नवीन मुजळगा येथील शिवाजी यादव दरेगावे (सोनकांबळे) यांचा मुलगा तानाजी दरेगावे (वय – २१) व जळबा भुजंग मरतोळे (टोंम्पे) यांची मुलगी दिक्षा यांचे मागील दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांचे नातलग असून ते एकमेकांच्या शेजारी राहत होते. मुलीच्या घरची परिस्थिती जेमतेम तर मुलाच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. गतवर्षी हे प्रेमी युगूल गावातून पळून गेले होते. त्यानंतर नातेवाइकांनी बैठक घेतली होती. मात्र मुलीच्या आई – वडिलांनी मुलाची हलाखीची परिस्थिती असल्याने या प्रेमविवाहास विरोध केला होता. मात्र या दोघांचे प्रेम अतुट असल्याने कधी तरी आपले आई वडील आपल्या विवाहास समंती देतील या आशेत हे प्रेमीयुगूल होते.

मात्र वर्ष उलटले तरी मुलीच्या घरच्यांचा विरोध कायम होता. त्यामुळे  बुधवार हे प्रेमीयुगूल गावातून गायब झाले. शनिवारी सायंकाळी चार वाजता गुराखी आपली जनावरे पाणी पाजण्यासाठी गावालगतच्या भेंड तलावात गेला असता त्यास दोन मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. त्याने ग्रामस्थांना माहिती दिली. मात्र यावेळी मुलाचे आई – वडील मजुरी करण्यासाठी मलकापूर येथे गेले होते.  सायंकाळी सहा वाजता पोलीस उपनिरीक्षक परशुराम मराडे हे घटनास्थळी दाखल झाले.

आपली प्रतिक्रिया द्या