कोविडला वैतागून दांपत्याची आत्महत्या

वरळी येथे भाडय़ाच्या खोलीत राहणाऱ्या दांपत्याने विष पिऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कोविडला वैतागून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी मृत्यूपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. वरळी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

अजय कुमार (34) आणि सुज्जा एस. (30) अशी त्या दांपत्याची नावे आहेत. मूळचे केरळचे राहणारे असलेले हे दोघे वरळी येथील भारत मिल्स कंपाऊंडमध्ये भाडय़ाने घर घेऊन राहत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. सुज्जा फोर्ट येथील एका खासगी बॅंकेत, तर अजय हा नवी मुंबईतील एका कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वी दोघांना कोविड झाला होता. त्यातून बरे झाल्यानंतर सुज्जा तिच्या आईच्या घरी जाऊन आली होती. दोघांचे सर्व काही सुरळीत सुरू असतानाही त्यांना कोरोनाची प्रचंड भीती वाटत होती. दरम्यान, कोविडची लक्षणे दिसू लागल्यावर त्यांना प्रचंड नैराश्य आले होते. त्यातूनच आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी मृत्यूपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

बुधवारी दुपारच्या वेळेस सुज्जाची आई तिला फोन करत होती, परंतु सुज्जाकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याच इमारतीत राहणाऱ्या सुज्जाच्या मित्राला फोन करून त्याला घरी जाऊन बघण्यास तिच्या आईने सांगितले. त्या मित्राने सुज्जाच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. तेव्हा शेजारच्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश घेतला असता अजय आणि सुज्जा हे दोघेही घरात मृतावस्थेत आढळून आले. दोघांच्याही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांनी कुठले विष घेतले ते स्पष्ट होईल असे वरळी पोलिसांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या