
सामना प्रतिनिधी, इगतपुरी
देशी बियाण्यांच्या संवर्धनातून शेतकऱयांची आत्मनिर्भरता व्हावी, देशी वाणांची जपणूक करून सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी लग्न समारंभात उपस्थितांचे देशी बियाणांची पाकिटे देऊन स्वागत करण्यात आले. देशी वाण असलेले गुलाबी मुळा, डांगर, खरबूज, चाकवत, कोथिंबीर आणि राजगिरा बियाणांचे वऱ्हाडी मंडळींना पाकिटे देण्यात आली. बियाण्यांची लागवड, उत्पादन आणि संवर्धन करण्यासाठी झटणारे कृषी विभागाचे अधिकारी संजय पाटील यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
तालुक्यात सेवा बजावलेले कृषी खात्याचे अधिकारी संजय पाटील यांचा मुलगा गौरांक याचा विवाह प्रियंका सराफ हिच्यासोबत आज झाला. या वेळी वऱहाडी मंडळींना अक्षतांसोबत बियाणांची पाकिटे देण्यात आली.अति रसायनांसह कीटकनाशकांचा वापर, देशी बियाण्यांची कमतरता यामुळे विविध प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर लग्नात स्वागत करतांना देशी बियाणे वाटपाच्या उपक्रमाद्वारे संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
देशी बियाण्याच्या जतनातून मिळणाऱ्या पोषक व सकस आहाराद्वारे शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी या उपक्रमाची संकल्पना सुचली असे संजय पाटील यांनी सांगितले. भविष्यातील पुढील पिढी जपण्यासाठी या उपक्रमाद्वारे हा अल्पसा प्रयत्न वऱ्हाडी मंडळींना भावला. देशी बियाण्यांची बँक सांभाळणाऱया अकोल्यातील कोंभाळणे येथील राहीबाई पोपेरे, भिल्ली येथील रमेश साकरकर यांच्याकडून मागवलेल्या देशी बियाण्यांची पाकिटे लग्न समारंभात वितरित करण्यात आली.






























































