
सामना प्रतिनिधी । ठाणे
आसनगाव येथे एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला कल्याण कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
शहापूर तालुक्यातील सावरोली येथे राहणारी प्रणाली गायकवाड ही अंबरनाथच्या आयटीआयमध्ये शिकत होती. 5 सप्टेंबर 2013 रोजी अंबरनाथ येथून सायंकाळी 6 वाजता ती आसनगाव स्थानकात उतरली. येथून ती चालत घरी सावरोली येथे जात असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अशोक मुकणे याने प्रणालीची वाट रोखली. जवळपास कुणीच नसल्याची संधी साधून त्याने तिला फरफटत निर्जनस्थळी नेले. तिचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रणालीने प्रतिकार केल्याने तिला बेदम मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. यानंतर जखमी अवस्थेत गळा दाबून तिला ठार केले आणि अशोक पसार झाला.
तपासाची शर्थ
दुसऱ्या दिवशी प्रणालीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आसनगाव रेल्वे स्थानकातील क्रॉसिंगजवळ आढळला. प्रणालीची आई वनिता यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना पोलिसांचा तपास आरोपीला फाशीपर्यंत घेऊन गेला. तपासी अंमलदार पोलीस उपअधीक्षक प्रशांत वाघुडे, पोलीस निरीक्षक सुनील वडके यांच्यासह उपनिरीक्षक मधुकर पवार, अकबर सय्यद, दिनेश निमगडे, एम. बी. होवाळ, दिव्या पाटील, विलास शिंपी यांच्या पथकाने या प्रकरणाचा कसून तपास केला.
मोबाईलमुळे लागला छडा
केवळ एका मोबाईलमुळे या तपास प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले. पीडितेचा चोरलेला मोबाईल एका दारूच्या गुत्त्यावर मुकणे याने विकला होता. पोलिसांना खबऱ्याकडून याची माहिती मिळताच मुकणेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. केवळ दारूसाठी प्रणालीची पर्स आणि मोबाईल हिसकवायचा होता. मात्र तिने प्रतिकार केल्याने बलात्कार करून खून केल्याचे मुकणे याने कबुली दिली होती. दरम्यान आज या प्रकरणाचा निकाल लागून आरोपी अशोक मुकणे याला फाशीची शिक्षा ठोठावली.
























































