
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी अटक टाळण्यासाठी केलेला अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने तात्पुरत्या काळासाठी फेटाळला. या प्रकरणात न्यायालय एटीएसचेही म्हणणे ऐपून घेणार असल्याने या जामीन अर्जाची पुढील सुनावणी 19 मार्च रोजी होणार आहे.
मनसुख हिरेन यांची पत्नी विमला यांच्या तक्रारीवरून एटीएसने मनसुख यांची हत्या झाल्याचा गुन्हा नोंदवला. मनसुख प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांच्यावरही आरोप होत असल्याने एटीएसने त्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात शुक्रवारी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. ठाणे सत्र न्यायालयात न्यायमूर्ती शैलेंद्र तांबे यांच्या दालनात आज सुनावणी झाली. वाझे यांच्या वतीने अॅड. के.एम. कालेकर यांनी युक्तिवाद केला.
तपास करणे आवश्यक
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐपून घेतल्यानंतर न्यायमूर्ती शैलेंद्र तांबे यांनी प्राथमिक तपासात पुरावे हे वाझे यांच्याविरोधात असल्याचे सांगितले. अर्जदार आरोपी वाझे यांना एटीएसने कस्टडीत घेऊन तपास करणे आवश्यक आहे, म्हणूनच त्यांचा अटकपूर्व जामीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळत असल्याचे सांगितले. या प्रकरणात 19 मार्च रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार असल्याचे विशेष सरकारी वकील विवेक कडू यांनी सांगितले.
घटनेच्या वेळी वाझे डोंगरीत होते
मनसुखचा मृतदेह सापडला त्यावेळी अर्जदार वाझे हे डोंगरी परिसरात होते. त्यामुळे मनसुखच्या हत्येशी त्यांचा काहीही संबंध नाही, असा वाझे यांच्या वतीने अॅड. कालेकर यांनी युक्तिवाद केला. 2004 च्या घटनेचा तपशीलही अॅड. कालेकर यांनी न्यायालयासमोर मांडला. 2004 च्या प्रकरणातही सचिन वाझे यांना गोवण्यात आले होते. त्यावेळी 28 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता. मनसुख प्रकरणात एटीएसने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात वाझेंवर पुठलाही आरोप नाही. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळावा, असा युक्तिवादही अॅड. कालेकर यांनी केला. तर सरकारी वकील विवेक कडू यांनी युक्तिवाद करताना वाझे आणि मनसुख हे एकमेकांना चांगले ओळखत होते. अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्कॉर्पिओ ही वाझे यांनी आधी वापरली आहे. आता या प्रकरणाचा तपास एटीएस करीत असल्याने जामीन नामंजूर करावा अशी मागणी केली.
वाझेंची रात्री उशिरापर्यंत चौकशी
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या संशयास्पद स्का@र्पिओ गाडीचा तपास एनआयए करत आहे. आज एनआयएने सचिन वाझे यांची तब्बल 12 तास चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरूच होती. स्कॉर्पिओ गाडी, गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्याशी वाझे यांचा काय संबंध यासंदर्भात एनआयएने वाझे यांच्याकडून माहिती घेतल्याचे सांगण्यात येते. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वाझे एनआयएच्या पेडर रोड येथील कार्यालयात पोहचले. यावेळी मुंबई गुन्हे शाखेचे एसीपी नितीन अलकनुरे तसेच एटीएसचे एसीपी श्रीपाद काळे हेदेखील उपस्थित होते. एनआयए कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकला होता.





























































