
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
तेरा हजार कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याला शनिवारी विशेष न्यायालयाने वर्तमानपत्रांद्वारे जाहीर समन्स बाजावले. या समन्समध्ये नीरवची बहीण पूर्वी आणि भाऊ निशाल मोदी यांचेही नाव आहे. हे समन्स आर्थिक घोटाळा करून पळून गेलेल्या फरारी आर्थिक अधिनियमातंर्गत जारी करण्यात आले आहे. आर्थिक गैरव्यवहार करून पळून गेलेल्या आरोपींबाबतच्या मुंबईतील विशेष न्यायालयाने या तिघांना २५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयात हजर होण्यास सांगितले आहे. ते हजर झाले नाहीत तर फरारी आर्थिक अधिनियमातंर्गत त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे या समन्समध्ये म्हटले आहे. जाहीर समन्स बजावण्यासह नीरवच्या मुंबईतील दोन पत्त्यांवरही समन्स पाठवण्यात आले आहे.
ईडीने फरारी आर्थिक गुन्ह्यांबाबतच्या नव्या अध्यादेशानुसार नीरव आणि त्याच्या कुटुंबीयांची मालमत्ता जप्त करण्याबाबत याचिका दाखल केली होती. ईडीने नीरवच्या साडेतीन हजार कोटींच्या संपत्तीची माहिती देऊन ती जप्त करण्याची परवानगी मागितली होती. ईडीच्या या याचिकेनंतर न्यायालयाने नीरव, पूर्वी आणि निशांत यांना नोटीस बजावून त्यांची मालमत्ता फरारी आर्थिक अधिनियमातंर्गत जप्त का करण्यात येऊ नये, त्यांना फरारी आरोपी घोषित का करू नये, असा सवाल केला होता. विशेष न्यायालयाने २५ जुलैला नीरवविरोधात समन्स बजावले होते. या प्रकरणातील आरोपी मेहूल चोक्सीलाही नोटीस पाठवून २६ सप्टेंबरपर्यंत न्यायालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे.
बँकांना ९००० कोटींचा चुना लावून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याविरोधातही ईडीने फरारी आर्थिक अधिनियमातंर्गत याचिका दाखल केली आहे. मल्ल्याची संपत्तीही या नव्या नियमाखाली जप्त करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. न्यायालयाने मल्ल्याला नोटीस पाठवून २७ ऑगस्टपर्यंत न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.



























































