सावधान! डेल्टाच्या नव्या म्युटंटची 7 जणांना बाधा, वेगाने संसर्ग फैलावण्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी या विषाणूचा धोका कायम आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या नव्या म्युटंटने धास्ती वाढवली आहे. डेल्टाच्या ‘एवाय 4’ म्युटंटचे इंदोरमध्ये सात रुग्ण आढळले आहेत. हा म्युटंट तुलनेत अधिक घातक आणि अधिक संसर्गजन्य आहे. याचा संसर्ग वेगाने पसरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा आरोग्य यंत्रणेने दिला आहे.

इंदोरमध्ये सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत 64 टक्क्यांनी वाढ झाली होती. लष्कराच्या महू छावणीत एकाचवेळी 44 अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे चिंता वाढल्याने जिनोम सिक्वेंसिंगसाठी काही रुग्णांचे नमुने दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण पेंद्राकडे (एनसीडीसी) पाठवले होते. त्या नमुन्यांचा तपासणी अहवाल एनसीडीसीकडून मिळाला आहे. त्यातील सात रुग्णांना डेल्टाच्या ‘एवाय 4’ म्युटंटची बाधा झाल्याचे आढळले आहे. यात लष्कराच्या महू छावणीतील दोन अधिकारी आहेत.

तज्ञांनी काय म्हटलेय?

‘एवाय 4’ हा अधिक संसर्गजन्य आहे. याचा संसर्गदर अधिक आहे. लोकांनी जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. सणासुदीत गर्दी करू नका, गर्दीत जाणे टाळा, मास्क लावा, असा सल्ला डॉ. रवी डोसी यांनी दिला आहे.

‘एवाय 4.2’ नावाचा सब व्हेरिएंट मूळ डेल्टापेक्षा 10 ते 15 टक्क्यांनी अधिक संसर्गजन्य आहे. तो सध्या मोठय़ा प्रमाणावर पसरण्याची शक्यता कमी आहे. मात्र निष्काळजी वागून चालणार नाही, असे तज्ञांनी म्हटले आहे.

हिंदुस्थानात सर्वप्रथम एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ‘एवाय 4’ म्युटंटचा रुग्ण आढळला होता. जगात सध्या या म्युटंटच्या संसर्ग क्षमतेबाबत अभ्यास सुरू आहे.

डेटाबेसमध्ये या म्युटंटची 10पेक्षा कमी रुग्णसंख्या नोंद झाली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या रोग नियंत्रण पेंद्राने दिली आहे. ब्रिटनमध्ये ‘व्हीयूआय-21ओसीटी-01’च्या 5120 रुग्णांची नोंद झाली आहे. हा ‘एवाय 4’ म्युटंटचाच प्रकार आहे.