महाराष्ट्रासह सहा राज्यांत कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील काही राज्यांत कोरोना महामारीचे संकट गंभीर होताना दिसत आहे. त्याचवेळी महाराष्ट्रास सहा राज्यांत कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे. ‘मॅथेमेटिकल प्रोजेक्शन’च्या आधारे आयआयटीने केलेल्या संशोधनातून ही दिलासादायक माहिती पुढे आली आहे.

आयआयटीच्या संशोधकांनी कोरोनाच्या लाटांचा अंदाज लावण्यासाठी SUTRA नावाचे गणितीय मॉडेल तयार केले आहे. यानुसार महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमधील कोरोनाची दुसरी लाट संपण्याच्या मार्गावर असल्याच दिसून येत आहे. ‘मॅथेमेटिकल प्रोजेक्शन’च्या आधारे संशोधन करून तयार केलेल्या अहवालात तामीळनाडू, पंजाब आणि आसाममध्ये कोरोनाची दुसरी लाट येणे बाकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

‘मॅथेमेटिकल प्रोजेक्शन’च्या आधारे केलेल्या या संशोधनात देशभरात मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली दिसेल. तर जुलैच्या अखेरपर्यंत कोरोनाची दुसरी लाट देशभरातून संपेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आयआयटीच्या संशोधकांनी वैज्ञानिक आकडेवारी आणि माहितीच्या आधारे कोणत्या राज्यात कोरोनाची कोणती लाट सुरू आहे याबाबत विश्लेषण केले आहे तसेच रुग्णवाढीचा अंदाज वर्तविला आहे. यानुसार पंजाब, तामीळनाडू, हिमाचल प्रदेश आणि आसाममध्ये कोरोनाची दुसरी लाट येणे बाकी आहे.

तामीळनाडूत 29 ते 31 मेदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक राहील.

पुडुचेरी आणि आसाममधील रुग्णसंख्याही दोन दिवसांत वाढलेली दिसेल.

पंजाबमध्ये 22 मे तर हिमाचल प्रदेशमध्ये 24 मे रोजी सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली जाण्याची शक्यता आहे.

या राज्यांतील रुग्णसंख्या घटली

कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरयाणा, दिल्ली आणि गोवा या राज्यांमध्ये हळूहळू रुग्णांमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे.