घरावर पोस्टर लावल्यानंतर कोरोना रुग्णांना अस्पृश्यासारखी वागणूक,  सर्वोच्च न्यायालयाने खडसावले 

supreme-court

कोरोना रुग्णांच्या घरावर पोस्टर लावल्यामुळे त्यांना अस्पृश्यासारखी वागणूक मिळत आहे आणि हे वास्तव असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने खडसावले. यासंदर्भात केंद्र सरकारने आपले म्हणणे मांडावे, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. या याचिकेवरील सुनावणी आता गुरुवारी होणार आहे.

राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या घरावर पोस्टर लावण्यात येत आहे. यामुळे कोरोना रुग्णांची बदनामी होत असून त्यांना समाजात तुच्छतेची वागणूक मिळत असल्याचा आरोप करत हे सर्व थांबविण्याची मागणी करणारी याचिका कुश कालरा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी चालू आहे. आज सुनावणीच्या वेळी खंडपीठाने कोरोना रुग्णांच्या घरांवर पोस्टर लावण्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी काही राज्य संक्रमण रोखण्यासाठी आपापल्या स्तरावर असे निर्णय घेत असल्याची माहिती दिली. त्यावर खंडपीठाने यासंदर्भात केंद्र सरकारने आपले म्हणणे मांडावे. त्यानंतर गुरुवारी या याचिकेवर पुढील सुनावणी करण्यात येईल असे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या