चंद्रपूरात कोविड रुग्णांना डॉ. निवृत्ती राठोड यांचा आधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वसामान्य कोरोना रुग्णांसाठी आधार म्हणजे जिल्हा रुग्णालय. जे रुग्ण महागडी आरोग्य सेवा खासगी रुग्णालयात जाऊन घेऊ शकत नाही, अशा रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय मोठा आधार ठरले आहे. याच रुग्णालयात कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे हॉस्पिटल वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त आहे. अशातच जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी या आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्याचे काम केले आहे.

आधीपासूनच हा अधिकारी आरोग्य यंत्रणेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. मितभाषी आणि कर्तव्यनिष्ठ असा हा अधिकारी सामान्यजनांना आपलासा वाटू लागला आहे. कोणताही रुग्ण इथं दाखल झाला की, आधी डॉ. निवृत्ती राठोड यांच्याशी संपर्क साधतो. कुणी बेडसाठी, कुणी औषधांसाठी, तर कुणी सल्ला घेण्यासाठी डॉ. राठोड यांनाच विचारणा करतो. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. राठोडही नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. त्यांनी कधीही आपल्या कर्तव्यात कुचराई केली नाही की कधी त्रागा केला नाही. रात्री-अपरात्री केव्हाही त्यांना फोन केल्यास तेवढ्याच आत्मीयतेने ते फोन स्वीकारतात आणि बोलतात. शासकीय यंत्रणेतील हा अजब माणूस याच गुणांमुळे लोकांत प्रसिद्ध झाला. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागलीय. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढीस लागला. पण असं असतानाही तणावरहित काम डॉ. राठोड करीत आहेत. रुग्ण आणि सेवेप्रति निष्ठा असेल तर काम किती सुरळीत होऊ शकते, याचा वस्तुपाठ राठोड यांनी घालून दिला आहे.