गायीच्या मृत्यूला कारणीभूत ठरले पोटातील 70 किलो प्लॅस्टिक

618

प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी असली तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा फटका एका गाईला बसला आहे. तिने खाद्यपदार्थांसह प्लॅस्टिकच्या पिशव्याही खाल्याने तिचा मृत्यू ओढवला आहे. प्लॅस्टिक पिशव्या, काचेच्या बांगड्या, ब्लेड व इतर प्राणघातक वस्तू खाण्यात आल्यामुळे अकलूज येथे एका गायीचा दुर्देवी मृत्यू ओढावल्याची घटना घडली आहे.

विजय चौकामध्ये दोन दिवसांपासून एक भटकी गाय पडून होती. तिचे पोट वाढले होते. ती गाय गाभण असावी, असे अनेकांना वाटत होते. मात्र, रविवारी या गाईच्या अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते व अकलूज ग्रामपंचायतीच्या मदतीने गाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी गायीचे शवविच्छेदन केल्यानंतर गायीच्या पोटातून तब्बल 70 किलो प्लॅस्टीकच्या पिशव्या, सुया, दाभण, दाढीचे ब्लेड, बांगड्यांच्या काचा, प्लॅस्टीकचे धागे असा कचरा बाहेर पडला. शवविच्छेदन करतेवेळी गायीच्या पोटातून बाहेर पडणाऱ्या या वस्तु पाहून डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले.

नागरीक आपल्या घरातील कचरा, उरलेले खाद्यपदार्थ प्लॅस्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरून रस्त्याच्या कडेला, कचरा कुंड्यांमध्ये टाकतात. अशा वस्तु भटक्या गाई, गुरे, जनावरे खातात. या घटकांचे पोटामध्ये विघटन, पचन होत नाही. त्यामुळे हा कचरा पोटात साठवला जातो. प्लॅस्टीकमुळे आतड्यांवर रासायनीक परिणाम होतात. जनावरांचे पोट फुगते, त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. मूत्र आणि मलविसर्जन होत नाही. त्यामुळे वेदना होऊन जनावरांचा मृत्यू होतो, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. सर्जेराव वाघमोडे यांनी दिली. यापूर्वी अकलूज शहरात 4 गाईंचा अशाच प्रकारे मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या