
मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर स्थानकाजवळचा ब्रिटिशकालीन कर्नाक पुलाच्या तोडकामासाठी उद्या, शनिवारी मध्यरात्री 11 वाजल्यापासून ते रविवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत 27 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या धोकादायक पुलाचा सांगाडा कापून अजस्त्र व्रेनद्वारे बाजूला केला जाणार आहे. त्यामुळे भायखळा आणि वडाळा ते सीएसएमटी लोकल सेवा बंद राहतील. शनिवार, 19 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता पुलाचे पाडकाम सुरू होणार असून रविवारी मध्यरात्री 2 वाजता काम संपेल.
36 मेल–एक्प्रेस रद्द
जम्बो ब्लॉक कालावधीमध्ये 36 मेल एक्स्प्रेस-गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यात मुंबई ते पुणे, नांदेड, जालना, अमरावती, कोल्हापूर, मनमाड, आदिलाबाद, हैदराबाद एक्प्रेसचा समावेश आहे. तर काही मेल-एक्प्रेस दादर, नाशिक, पनवेल, पुणे येथून शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत.
बेस्टची विशेष बससेवा
शनिवारी रात्री 10.30 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 6.30 वाजेपर्यंत बेस्टकडून वडाळा स्टेशन ते कुलाबा आगार, सीएसएमटी टर्मिनस ते दादर स्टेशन पूर्व, भायखळा स्टेशन पश्चिम ते कुलाबा डेपो यादरम्यान प्रत्येक मार्गावर एकूण चार अतिरिक्त बस म्हणजेच 12 जादा बसेस बेस्टकडून चालवण्यात येतील.


























































