खेकडे धरण फोडू शकतात! ‘मेरी’च्या वैज्ञानिकांचा दावा

138
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

खेकडे धरण फोडू शकतात, असा दावा महाराष्ट्र इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट (मेरी)च्या वैज्ञानिकांनी केला आहे. या वैज्ञानिकांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कश्यपी नदीवरील वाघेरे धरणातील गळतीचा अभ्यास करून 2004 सालीच असा अहवाल दिला होता.

निवृत्त वैज्ञानिक संशोधन अधिकारी नामदेव पठाडे यांनी हे संशोधन केले होते. धरणाच्या वा कालव्याच्या पाण्यात एकच खेकडा नसतो, तर लाखो खेकडे असतात. उन्हाळय़ात जिथवर पाणी जाते तेथपर्यंत हे खेकडे बीळ करत जातात. ही असंख्य बिळे आत एकत्र झाली तर मोठी बिळे तयार होतात. त्यातूनच गळती होते. पाण्याच्या प्रवाहाचा दाब वाढला की ही बिळे मोठी होतात. त्यामुळे धरणाला धोका निर्माण होतो, असे पठाडे यांनी सांगितले.

रोहा येथील काळ प्रकल्पात कुंडलिका डावा तट कालव्यात आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरात गळतीची तक्रार होती. त्याचाही अभ्यास पठाडे आणि त्यांच्या टीमने केला होता. खेकडय़ांमध्ये कमालीची ताकद असते. त्यांच्या नांग्या इतक्या अणकुचीदार असतात की, ते दगडदेखील कोरू शकतात. वाघेरे आणि कुंडलिकाच्या संशोधनातून ही बाब प्रकर्षाने पुढे आली होती, असेही पठाडे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या