13 लाख हिंदुस्थानींचा डेबिट-क्रेडिट डेटा चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जवळपास 13 लाख हिंदुस्थानींच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डेटा लीक झाला आहे. जोकर स्टॅश नावाच्या वेबसाईटवर कार्डची विस्तृत माहिती ऑनलाइन विकली जात असल्याचे उघड झाले आहे. एटीएम मशीन किंवा पॉइंट ऑफ सेल मशीनचा वापर करताना कार्डवर लावण्यात आलेल्या मॅग्नेटिक पट्टीला स्कीम करून युजरच्या कार्डचा डेटा चोरण्यात आला आहे.

सिंगापूरची सायबर डेटा विश्लेषण करणारी प्रसिद्ध संस्था आयबीच्या माहितीनुसार, हॅकरची वेबसाईट असलेल्या जोकर स्टॅशवर 13 लाख बँक कार्डचा डेटा ऑनलाइन विकला जात आहे. यातील 98 टक्के कार्ड डिटेल्स हिंदुस्थानातील आहेत. सप्टेंबर 2019पर्यंत हिंदुस्थानात डेबिट आणि क्रेडिट कार्ड मिळून एकूण 9.717 कोटी कार्ड संचालित करण्यात आली आहेत. ट्रॅक वन आणि ट्रॅक टू या प्रकारातील डेटा हॅकर्सकडून विकला जात आहे. ऑनलाइन ट्रान्झॅक्शनसाठी किंवा क्लोनिंगसाठी त्याचा वापर केला जातो.

गु्रप आयबीच्या तज्ज्ञांनी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 100 डॉलरला (अंदाजे 7 हजार रुपये) प्रत्येक कार्डचा डेटा विकला जात आहे. आयबीचे संस्थापक आणि सीईओ इलिया सचकोव्ह यांनी सांगितले की, हिंदुस्थानी बँकांच्या कार्डची माहिती विकली जात असल्याचा हा गेल्या बारा महिन्यांतील पहिलाच प्रकार आहे. संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

18 टक्के कार्ड एकाच बँकेचे
युरोप आणि उत्तर अमेरिकेतील अन्य देशांतील बँका आणि पेमेंट व्हेंडर यांना एका कायद्यानुसार लॉ एन्फोर्समेंट, रेग्युलेटर आणि ग्राहकांना डेटा चोरीला गेल्याच्या 24 तासांच्या आत माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, हिंदुस्थानात कधीतरीच ग्राहकांना आपल्या खात्यासंबंधी किंवा कार्डची माहिती लीक झाल्याची माहिती दिली जाते, तीही उशिरा असे डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, आयबीने कोणत्याही बँकेचं नाव उघड केलं नाही. मात्र, 18 टक्के कार्ड हे एकाच बँकेचे असल्याचे सांगितले जात आहे.