GST दर कमी करण्याचे श्रेय राज्य सरकारांना जाते, ममता बॅनर्जी यांचा मोदी सरकारवर निशाणा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या जीएसटी धोरणावर जोरदार टीका केली आहे. कोलकात्यात दुर्गापूजा उद्घाटन सोहळ्यादरम्यान बोलताना त्यांनी जीएसटी दर कमी करण्याचे श्रेय राज्य सरकारांना दिले. पंतप्रधान मोदी यांनी आज राष्ट्राला संबोधित करताना जीएसटी बाबत केलेल्या वाक्व्यावरून ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “जीएसटी दर कमी करण्याचे खरे श्रेय राज्य सरकारांना जाते, ज्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.”

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर आरोप केला की, ते जीएसटीच्या नावाखाली जनतेची लूट करत आहे. “जीएसटीमुळे सामान्य माणसावर मोठा बोजा पडला आहे. केंद्र सरकारने जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दर कमी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय राज्य सरकारांच्या दबावामुळे घ्यावा लागला,” असे त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, “पश्चिम बंगाल सरकारने सातत्याने जीएसटीमधील जाचक कर दर आणि कठीण प्रक्रियांवर आक्षेप घेतले होते. आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत की, जीएसटीमध्ये सुधारणा आवश्यक आहे. सामान्य उपभोगाच्या वस्तूंवरील कर कमी करणे आणि प्रक्रिया सुलभ करणे गरजेचे आहे.”