
सामना प्रतिनिधी । ठाणे
खाडीचे खारे पाणी पिण्यायोग्य बनवण्याच्या ठाणे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरून आज महासभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ माजवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेने गोंधळींचे सर्व विरोध हाणून पाडत निकालात निघालेल्या हरकती व सूचनांचा प्रस्ताव 58 विरुद्ध 38 अशा बहुमताने मंजूर करून घेतला. त्यामुळे खाडीचे पाणी ‘गोड’ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऑस्ट्रेलिया, चीन, जपान आणि आखाती देशांच्या धर्तीवर ठाण्याच्या खाडीच्या क्षारयुक्त पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी केवळ 60 रुपये दरात एक हजार लिटर देण्याची ही योजना आहे. मात्र सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी, भाजपने त्याला विरोध केला. न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळल्यानंतर पालिकेने नागरिकांच्या हरकती सूचनावर सुनावणी घेतली. त्या राज्य शासनाकडे पाठवण्यासाठीचा प्रस्ताव आज झालेल्या महासभेत प्रशासनाने मांडला. त्याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला. भाजपनेही विरोध करून गोंधळ घातला. त्याला शिवसेनेच्या नगरसेवकांनी तोडीचे उत्तर दिले. अखेर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या प्रस्तावावर मतदान घेण्याचे आदेश दिले.
































































