
यजमान ऑस्ट्रेलियाने येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा दुसरा दिवसही गाजवला. मार्नस लॅबुशेग, स्टीवन स्मिथ, टीम पेन यांची अर्धशतके आणि ट्रेव्हिस हेडने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 467 धावा तडकावल्या. न्यूझीलंडची अवस्था दुसऱया दिवसअखेरीस 2 बाद 44 धावा अशी झाली असून आता ते 423 धावांनी पिछाडीवर आहेत.
ऑस्ट्रेलियाने 4 बाद 257 या धावसंख्येवरून शुक्रवारी पुढे खेळायला सुरुवात केली. स्टीवन स्मिथला शतक झळकावता आले नाही. तो 85 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 1 षटकार व 8 चौकार चोपून काढले. त्यानंतर ट्रेव्हिस हेड व टीम पेन या जोडीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ट्रेव्हिस हेडने 12 चौकारांसह 114 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. कर्णधार टीम पेनने 79 धावा फटकावल्या. न्यूझीलंडकडून नील वॅगनरने 83 धावा देत 4 फलंदाज बाद केले. न्यूझीलंडला पहिल्या डावात आश्वासक सुरुवात करता आली नाही. पॅट कमिन्सने टॉम ब्लंडेलला 15 धावांवर, तर जेम्स पॅट्टिनसनने केन विल्यमसनला 9 धावांवर बाद केले. आता टॉम लॅथम 9 धावांवर तर रॉस टेलर 2 धावांवर खेळत आहे.






























































