
रमेश पोवार यांची हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची खुर्ची रिकामी झाली. आता ही जागा भरण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) अर्ज मागवण्यात आले. या एका प्रतिष्ठत जागेसाठी तब्बल नऊ अर्ज आले. पण आता या प्रशिक्षक पद नियुक्तीमध्ये लोकपालचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. एमसीएच्या कामकाजावर लोकपाल यांची नजर असते.
एमसीएकडून क्रिकेट सुधारणा समितीमध्ये लालचंद राजपूत, राजू कुलकर्णी व समीर दिघे यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर काही वादामुळे त्यांना तडकाफडकी या समितीमधून काढून टाकण्यात आले आणि त्यांच्याऐवजी विनोद कांबळी, जतीन परांजपे व नीलेश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. जुन्या क्रिकेट सुधारणा समितीतील सदस्यांनी या प्रकरणाबाबत लोकपालांकडे धाव घेतली आहे. लोकपालांकडून या प्रकरणावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. जुने प्रकरण मिटवण्यासाठीच एमसीएकडून नव्या समितीची घोषणा करण्यात आली असून या अंतर्गत मुंबईच्या सीनियर संघाचा पुढील प्रशिक्षकही निवडण्यात येणार आहे. आगामी काळात लोकपालांनी नियमाला अनुसरून पाऊल उचलल्यास एमसीएच्या कार्यकारिणीला नवी समिती व नव्या प्रशिक्षकाची निवड रद्द करावी लागू शकते, असे या वेळी सूत्रांकडून सांगण्यात आले.
या व्यक्तींनी प्रशिक्षक पदासाठी केला अर्ज
-
बलविंदर संधू
-
वासीम जाफर
-
सुलक्षण कुलकर्णी
-
साईराज बहुतुले
-
अमोल मुजुमदार
-
प्रदीप सुंदरम
-
उमेश पटवाल
-
नंदन फडणीस
-
विनोद राघवन
























































