
दक्षिण आफ्रिकन संघाने मिळवलेले तिन्ही विजय भन्नाट आणि सुसाट आहेत. परवा त्यांनी इंग्लिश सिंहाची कत्तल केली होती. ती कत्तलच होती. आता त्यांनी वाघाच्या शिकारीसाठी वानखेडेवर जाळं पसरवलंय. पराभवाने खचलेल्या बांगलादेशची शेळी झालीय. चौथा विजय मिळवून दक्षिण आफ्रिका आपले उपांत्य फेरीतील स्थान अधिक मजबूत करण्यासाठी सज्ज झालीच आहे. चौथ्या पराभवाने वर्ल्ड कपमधील बांगलादेशचे आव्हानही संपुष्टात होईल.
पुन्हा 400 धावांचे लक्ष्य
वानखेडेवर हेन्रिक क्लासेनच्या शतकी वादळाने जगज्जेत्या इंग्लंडचा पालापाचोळा केला होता. त्यामुळे वानखेडेवर पुन्हा एकदा त्याच खेळीची पुनरावृत्ती करण्याची रणनीती आफ्रिकन संघाने आखली आहे. इंग्लंडविरुद्ध ते 399पर्यंत पोहोचले होते, पण उद्या 400पेक्षा मोठी धावसंख्या गाठण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर आफ्रिकेने फलंदाजीचा निर्णय घेतला तरी आश्चर्य वाटणार नाही. रिझा हेंड्रिक्सलाही शतकाचे वेध लागले आहेत. आतापर्यंत आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉक, एडन मार्करम, रॅसी डुसेन आणि हेन्रिक क्लासेन यांनी शतके ठोकली आहेत. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक पाच शतके यांनीच ठोकली आहेत. गेल्या सामन्यात नसलेला कर्णधार टेम्बा बवुमा उद्या संघाचे नेतृत्व सांभाळेल.
बांगलादेशसमोर ‘करो या मरो’
बांगलादेशने आतापर्यंत केवळ अफगाणिस्तानलाच नमवले आहे. तसेच सलग तीन पराभव त्यांना पचवावे लागले आहेत. या पराभवांमुळे त्यांचा संघ खचला आहे आणि आफ्रिकन संघाच्या वेगापुढे त्यांचा निभाव लागणे कठीण आहे. हिंदुस्थानविरुद्ध त्यांनी समाधानकारक फलंदाजी केली होती, पण शाकीबच्या अनुपस्थितीत त्यांची गोलंदाजी कमकुवत भासली. पण आता स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कर्णधार शाकीब अल हसनला मैदानात उतरावेच लागणार आहे. कारण सलग चौथा पराभव त्यांचे आव्हान संपुष्टात आणणारा ठरू शकतो. बांगलादेश संघात दोन-तीन बदल अपेक्षित आहेत, पण आफ्रिका आपल्या त्याच विजयी संघाला कायम ठेवण्याच्या मनस्थितीत आहे. वानखेडेवर पुन्हा एकदा षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी मुंबईकर गर्दी करण्याची शक्यता आहे, पण असह्य उकाडय़ात गर्दीचा आकडा काहीसा कमीच असेल.


























































