पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर कैफचा हल्ला, सुनावले खडे बोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा माजी क्रिकेट खेळाडू मोहम्मद कैफ याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. इम्रान खान यांनी हिंदुस्थानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण अल्पसंख्यांकाशी कसे वागावे हे शिकवणार असल्याचे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरून कैफने इम्रान यांना खडे बोल सुनावले आहेत.

कैफने ट्विटरवरून इम्रान खान यांच्यावर टिकास्त्र सोडताना म्हटले की, फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानात जवळपास 20 टक्के अल्पसंख्यांक होते आणि आता फक्त ते 2 टक्क्यांवर आले आहेत. तर दुसरीकडे हिंदुस्थानात स्वातंत्र्यानंतर सातत्याने अल्पसंख्यांकांची संख्या वाढत आहे. अल्पसंख्यांकाशी कसे वागावे हे शिकवणाऱ्याच्या यादीत पाकिस्तान शेवटचा देश असावा असाही टोला कैफने लगावला.

काय आहे नक्की प्रकार?
लाहोर येथील एका कार्यक्रमात इम्रान खान यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटेल असा पाकिस्तान घडवणार असल्याचा दावा केला होता. त्यावेळी त्यांनी हिंदुस्थानच्या पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. ‘अल्पसंख्यांकांशी कसे वागावे, हे आम्ही मोदी सरकारला शिकवणार आहोत. हिंदुस्थानमध्ये अल्पसंख्यांकांना समान नागरिकत्वाची वागणूक मिळत नाही’, असे ते म्हणाले होते.

नसरुद्दीन शहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी माझ्या मुलांना हिंदुस्थानत ठेवण्याची भीती वाटत असल्याचे वक्तव्य केले होते. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात गोरक्षकांनी एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्या घटनेवर शहा यांनी भाष्य केले होते. हाच धागा पकडून इम्रान यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.