बीड शहरात भर दुपारी बसस्थानकासमोर धारदार शस्त्राने तरूणाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड शहरात भर दुपारी थरार उडवून देणारी घटना घडली. अज्ञात तीन ते चार जणांनी मिळून एका चोवीस वर्षीय तरूणावर तलवारीसह अन्य धारदार शस्त्राने वार केल्याने सदरील तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही घटना बीड बसस्थानकासमोरील एक बँकेसमोर घडली. जखमी तरुणाला उपचारासाठी बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

भर दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील खासबाग भागात राहणारा 24 वर्षीय शेख शाहिद शेख सत्तार या तरूणावर तीन ते चार तरूणांनी धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असता त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयास दाखल केले. डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत असून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. या घटनेमागील कारण अद्याप कळले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.