मौजमजेसाठी गाड्या चोरणारे बंटी-बबली जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्या चोरून मौजमजा करणारे उच्चशिक्षित बंटी- बबली शिवाजी पार्क पोलिसांच्या रंगेहाथ हाती लागले. त्यांच्याकडून चोरीच्या पाच गाड्या हस्तगत करण्यात आल्या.

दादरच्या सेनापती बापट मार्गावर नीलेश पटवर्धन यांनी त्यांची इनोव्हा कार पार्क केली होती. बुधवारी सायंकाळी ते गाडीजवळ गेले असता गाडी जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे नीलेश यांनी त्यांच्या दुचाकीवरून परिसरात गाडीचा शोध सुरू केला असता त्यांना माहीम येथील एका पेट्रोलपंपाजवळ त्यांची गाडी दिसली. त्यामुळे नीलेश यांनी तत्काळ शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठून पोलिसांना गाडीबद्दल सांगितले. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पंढरीनाथ कांदे, जगताप, तसेच अंमलदार उत्तम महाडिक, संदीप शेलार, ज्ञानेश्वर केकाण, विनोद पाटील, महेंद्र बाविस्कर, सूर्यवंशी व पाटील यांनी तपास सुरू केला. पथकाने माहीमच्या पेट्रोलपंप येथील कर्मचाऱ्यांकडून त्या इनोव्हा गाडीबद्दल विचारले असता एक जोडपे टोइंग गाडीने ही इनोव्हा येथे घेऊन आले. गुरुवारी सकाळी ते बॅटरी घेऊन येणार असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यामुळे पेट्रोलपंपात सापळा लावला. गुरुवारी सकाळी पारस चोथानी (33) आणि तसनीम रूपावाला (38) हे बंटी- बबली गाडी नेण्यासाठी येताच पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांनी चोरलेल्या दोन इनोव्हा, एक स्कोडा फॅबियो, बुलेट हस्तगत करण्यात आल्या.