‘डॉ. बॉम्ब’चा शेवट आता तुरुंगातच!

452

खतरनाक दहशतवादी डॉ. जलील अन्सारी ऊर्फ ‘डॉ. बॉम्ब’ आता पुरता लटकला. 21 दिवसांच्या पॅरोलवर आल्यानंतर तो यूपीला पळून गेला होता. त्याला एटीएसने पकडून आणला व आग्रीपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची रवानगी आता आर्थर रोड तुरुंगात केली असून लवकरच तो अजमेर तुरुंगात जाणार आहे.

52 बॉम्बस्फोटांची मालिका घडवून देश हादरवून टाकणारा डॉ. बॉम्ब हा गेल्या 25 वर्षांपासून तुरुंगात आहे. डिसेंबर महिन्यात त्याला चांगली वागणूक असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 21 दिवसांचा पॅरोल दिला. त्यानुसार तो पॅरोलवर मुंबईत आला, परंतु पॅरोल संपण्यास एक दिवसाचा अवधी असताना तो यूपीला पळून गेला. महाराष्ट्र एटीएसने त्याला यूपी एसटीएफच्या मदतीने पकडले. काल त्याला एटीएसच्या विक्रोळी युनिटने मुंबईत आणले. त्यानंतर आग्रीपाडा पोलिसांनी जाऊन अन्सारीला ताब्यात घेतले आणि रात्री उशिरा आर्थर रोड कारागृहात धाडले. आता आर्थर रोड कारागृह अजमेर कारागृहाशी संपर्प साधून त्याचा ताबा घेण्यास सांगितले. मानवतेच्या दृष्टिकोनातून डॉ. अन्सारीला पॅरोल मिळाला होता पण त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचा भंग केल्याने यापुढे त्याला पॅरोल मिळणे अशक्यच झाले आहे. त्यामुळे डॉ. बॉम्बचा शेवट आता कारागृहात होणार हे अटळ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या