
विम्याची बेनिफिट रक्कम मिळवून देतो असे सांगून महापालिकेच्या अभियंत्याची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. चार लाख 13 हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पंतनगर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे मुंबई महापालिकेत अभियंते आहेत. पाच दिवसांपूर्वी तक्रारदार हे कार्यालयात काम करत असताना त्यांना मोबाईलवर एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने तो आपण दिल्लीच्या गुडगाव येथील एका खासगी विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. कंपनीची नवी पॉलिसी आली असून त्या पॉलिसीची माहिती तक्रारदार यांना सांगण्यात आली. दोन पॉलिसीवर साडेआठ लाख रुपयांचा बेनिफिट मिळणार असल्याच्या भूलथापा मारल्या. बेनिफिट रकमेसाठी तुम्हाला काही रक्कम जमा करावी लागणार असल्याचे तक्रारदार यांना सांगण्यात आले.
त्यानंतर आणखी दोघांनी तक्रारदार यांना फोन करून तुमच्या पॉलिसीचे प्रोसेस सुरू झाले आहे. प्रोसेससाठी तुम्हाला सर्व्हिस टॅक्स, जीएसटी, टीडीएस आणि इतर कर भरावे लागणार असल्याचे सांगून ठगांनी दिलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितली. बेनिफिट रकमेच्या नादात तक्रारदार याने 4 लाख 13 हजार रुपये विविध खात्यांत भरले. पैसे भरल्यानंतर तक्रारदार यांना पॉलिसी बेनिफिटची रक्कम बँक खात्यात जमा झाली नव्हती. त्या रकमेबाबत तक्रारदार यांनी फोन केला असता ते दोन्ही नंबर बंद होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यानी पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पंतनगर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

























































