
जर्मनीच्या म्युनिक विमानतळावर सामानाच्या तपासणी दरम्यान एक खळबळजनक घटना घडली आहे. एका व्यक्तीच्या सुटकेसमध्ये चक्क सुसर आढळल्याने विमानतळावर खळबळ उडाली. हा व्यक्ती सुसर सुटकेसमध्ये लपवून त्याची तस्करी करण्यासाठी घेऊन जात होता. याप्रकरणी 42 वर्षांच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, आरोपी हा अमेरीकेचा नागरिक आहे आणि तो जर्मनीहून सिंगापूरला जात होता. म्यूनिख विमानतळावर तपासणी दरम्यान स्कॅनरमध्ये सुटकेसच्या आत काहीतरी संशयास्पद आढळले. अशावेळी सुटकेस खोलल्यावर हादरलेच, कारण आत 1 मीटर लांबीची पांढऱ्या रंगाची सुसर होती. सध्या याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे आणि रेस्क्यू टिमला पाचारण करुन त्या सुसरीला प्राणीसंग्रहालयात सोडण्यात आले आहे.
याप्रकारच्या पांढऱ्या सुसरची तस्करी करुन 50 ते 60 लाख रुपये कमावतात. अशाप्रकारच्या तस्करीचे हे पहिलेच प्रकरण नाही. सोन्यापासून साप, कासव तस्करीची प्रकरणे समोर येत असतात. तस्करी करण्यासाठी लोकं वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. मात्र आता तर सुसरची तस्करी करण्यात आल्याने सगळेच चक्रावले आहेत.




























































