
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्हा एका धक्कादायक घटनेने हादरला आहे. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेत दुचाकीला कट लावण्याच्या क्षुल्लक वादातून देशी कट्ट्याने गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आली आहे. .यावेळी संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जाळली. ही घटना यवतमाळ शहरातील कळंब चौकात मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी मारेक-याला जेरबंद केले असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
शादाब खान रफीक खान असे मृतकाचे नाव आहे. तर मनिष सागर शेंद्रे यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता दरम्यान पोलीस स्टेशन यवतमाळ शहर हद्दीतील R.T.O. ऑफीस चौकातुन कळंब चौक परिसरात आरोपी मनिष सागर शेंद्रे हा त्याच्या मैत्रीणीसोबत जात होता. यातील मृतक शादाब खान रफीक खान यास वाहनाचा कट लागला. त्यामुळे आरोपी व मृतक यांच्या मध्ये वाद झाला.मैत्रिणींसमोर झालेल्या या क्षुल्लक वादावादीमुळे मनीष हा व्यथित झाला . त्याचा अहंकार दुखावल्या गेल्यामुळे आरोपीने घरी जाउन देशी कट्टा घेउन परत कळंब चौक येथे आला. शादाब यास त्याने जाब विचारला. तेव्हा मृतक व आरोपी यांचेमध्ये पुन्हा वाद झाला. आरोपी मनिष शेंद्रे याने त्याचे जवळच्या देशी कट्ट्याने शादाबवर गोळी झाडली. शादाबच्या छातीत गोळी लागली. यावेळी शादाब याला शासकीय रूग्णालय यवतमाळ येथे भरती करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान शादाब खान याचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपीची दुचाकी पेटवून दिली.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखेचे आधार सिंग सोनोने, अवधूतवाडी ठाणेदार ज्ञानोबा देवकते, शहर ठाणेदार सतीश चवरे यांनी घटनास्थळ गाठले. . शहरात अनुचित प्रकार घडु नये म्हणून दंगल नियंत्रण सुरक्षा पथकाला पाचारण करण्यात आले होते. तातडीने पोलिसांनी आपली चक्रे फिरवीत आरोपीस अटक केली . या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रीया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.सध्या परिसरामध्ये शांतता असून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिक्स पॉईट व अतिरीक्त बंदोबस्त नेमण्यात आले आहे. सदर घटनेसंबधाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश चवरे यांनी केले आहे.


























































