कश्मीरमध्ये ५ हजार पाचशे बंकर, दोनशे सभागृह बांधणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पाकिस्तानच्या सीमेवरील तणावाचे वातावरण लक्षात घेऊन सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ५ हजार ५०० भूमिगत बंकर आणि २०० सामुदायिक सभागृह उभारण्यात येणार आहेत. वर्षअखेरीपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी १५३.६० कोटींचा खर्च येणार असून केंद्रीय गृहमंत्राल आणि राज्य सरकारने याला मंजुरी दिली.

सीमेपासून तीन किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी १२० किलोमीटरच्या परिसरात सात ब्लॉकमध्ये ५ हजार १९६ बंकर उभारण्यात येणार आहेत. जिल्हा विकास आयुक्त शाहीद इक्बाल चौधरी यांनी याबाबत बैठक घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात येणाऱ्या बंकर आणि सामुदायिक सभागृहांबाबत अधिकाऱयांना सूचना दिल्या. सुंदरबनी, नौशेरा,  डुंगी, राजौरी, पंचग्राम आणि मनाजकोट या ठिकाणी हे बंकर उभारण्यात येणार आहेत. सीमेपासून तीन किलोमीटरच्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी २६० सामुदायिक बंकर आणि १६० सामुदायिक सभागृह उभारण्यात येणार आहेत. या सभागृहात सुमारे १० हजार नागरिकांना आश्रय घेता येईल अशी माहितीही त्यांनी दिली. हे बंकर आणि सभागृह  शाळा, रुग्णालय, पोलीस ठाणे, सरकारी इमारतीशेजारी उभारण्यात येतील. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आश्रय घेणे सोपे होणार आहे.

महिनाभरात प्रक्रिया पूर्ण होणार

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार याची प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण होणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महिनाभरात कामाला सुरुवात होणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. सीमेजवळील नागरिकांच्या सुरक्षेसाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्राने १४ हजार ४६० बंकर उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी ४१५.७३ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.