टेन्शनमध्ये आहात का? मग ‘इथे’ जा आणि भोकाड पसरा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सूरत

माणसाचा सर्वात घातक शत्रू म्हणजे तणाव. रोजच्या जीवनात माणसाच्या अगदी हातात हात घालून वावरणाऱ्या या ताणाला दूर ठेवण्यासाठी नानाविध उपाय केले जातात. अॅनिमल थेरपी, लाफिंग थेरपी, योगासनं अशा अनेक पद्धती तणावनियंत्रणासाठी उपयुक्त आहेत. पण, जर कुणी तुम्हाला ताण घालवण्यासाठी हसण्याऐवजी रडायला सांगितलं तर? हो. हे खरं आहे. सूरतमध्ये एक क्लब असाही आहे, जिथे लोकं फक्त रडण्यासाठीच जातात.

लोकं या क्लबमध्ये येतात आणि पार भोकाड पसरून रडतात. त्याने त्यांच्या हृदयावरचा ताण कमी होतो आणि मन शांत होतं. या क्लबच्या संस्थापकांच्या म्हणण्यानुसार, रडणं हाही एक प्रकारचा व्यायाम आहे आणि तो अतिशय फायदेशीर आहे. भावनांच्या भरात आलेले अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करू नये, असं इथल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण, मानवी अश्रुंमध्ये कोर्टसॉल नावाचं रसायन असतं, जे मानवी शरीरासाठी घातक असतं. ते अश्रुंवाटे शरीराच्या बाहेर पडणं गरजेचं असतं. जर ते शरीरात राहिलं तर त्याने तणाव आणखी वाढू शकतो. अर्थात हे ऐकणाऱ्याचा त्याच्यावर विश्वास बसत नसला तरी या क्लबमध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

साधारणतः रडल्याने माणसाला त्रास होत असल्याचं मानलं गेलं आहे. पण, रडणं ही सुद्धा हसण्यासारखीच एक भावना आहे. जसा आपल्याला आनंद झाल्यानंतर आपण हसून घेतो, ते दाबत नाही. तसंच दुःख,ताण किंवा चिंता या काळात जर रडू आलं तर रडू दाबून ठेवू नये. कारण, त्याने अजून त्रास होतो, असं इथल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.